देवेंद्र फडणवीसांच्या आकडेवारीची उद्या पोलखोल करणार; शिवसेनेचा हल्लाबोल
महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळतं का? याचा विचार त्यांनी करायला हवा होता. सरकारमध्ये बसलेले अनेक जण अर्थशास्त्र जाणतात, असं म्हणत अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
मुंबई : कोरोनाच्या संकटात राज्यतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने राज्याला कशी भरीव मदत केली, याची आकडेवारी जनतेसमोर मांडली. त्यानंतर सत्ता पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडलेली आकडेवारीत घोळ आहे. राज्यातील लोकांना मुर्ख बनवण्याचं काम सुरु असून या आकडेवारीची उद्या पोलखोल करणार असल्याचं शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
पुढे अनिल परब म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला आज मोठे आर्थिक सल्ले दिले आहेत. राज्य सरकारने काय करायला हवं, कशा उपाययोजना करायला पाहिजे, याबद्दल फार मोठं मार्गदर्शन त्यांनी केलं. मात्र हे करताना, महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळतं का? याचा विचार त्यांनी करायला हवा होता. सरकारमध्ये बसलेले अनेक जण अर्थशास्त्र जाणतात. सरकार कसं चालतं याची जाणीव महाविकास आघाडी सरकारला आहे, असं म्हणत अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस यांनी जे विषय आज मांडले त्यातून महाराष्ट्र सरकारला काहीच कळत नाही, जे काही समजतं ते आम्हालाच समजतं, असं दाखवायचा प्रयत्न केला. आमच्या सल्लानुसार सरकार चाललं तरच कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढू शकतो, असं सांगण्याचा त्यांचा कल होता, असं अनिल परब यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने महाराष्ट्राल किती मोठी मदत केली, याची आकडेवारीसह यादी देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली. फडणवीसांनी वाचून दाखवलेल्या आकडेवारीची पोलखोल, सविस्तर चिरफाड अतिशय सोप्या भाषेत उद्या राज्यातल्या जनतेसाठी सरकारच्या वतीने करण्यात येईल, असं देखील अनिल परब यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं काम करतं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अहोरात्र कष्ट करून सर्व तज्ज्ञांशी बोलून कोरोना संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही अनिल परब म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत आहेत. अशारीतीने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार केलं जात आहे. वारंवार खोटी वक्तव्य केलं की ते लोकांना खरं वाटू लागतं. मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केलं जातं. महाराष्ट्राला यात जास्तच मिळतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे. शेतीसाठी केंद्र सरकारने 9 हजार कोटी रुपये दिले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केंद्र सरकारने केला. श्रमिक विशेष रेल्वेसाठी 300 रुपये दिले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटींची मदत केली. राज्याला 4 हजार 592 कोटींचं अन्नधान्य दिलं, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडली.
Devendra Fadnavis | केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात