केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात
केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत आहेत. अशारीतीने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार केलं जात आहे. वारंवार खोटी वक्तव्य केलं की ते लोकांना खरं वाटू लागतं. मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केलं जातं. महाराष्ट्राला यात जास्तच मिळतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे. शेतीसाठी केंद्र सरकारने 9 हजार कोटी रुपये दिले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केंद्र सरकारने केला. श्रमिक विशेष रेल्वेसाठी 300 रुपये दिले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटींची मदत केली. राज्याला 4 हजार 592 कोटींचं अन्नधान्य दिलं, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडली.
महाविकास आघाडी सरकारवर घणाघात
कोरोनाच्या परिस्थितीतही राजभवन आणि मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठका कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात आहेत की राजकीय खलबतांसाठी हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र या परिस्थितीत कोरोना या विषयाला प्राधान्य असायला हवं. भाजपमध्ये सरकार अस्थिर करण्याची कुठलीही हालचाल सुरू नाही. हे सरकार त्यांच्याच कर्माने जाईल. मात्र एक गोष्ट नक्की आहे की या सरकारकडून काही गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत ज्याच्यामुळे मूळ विषयापासून लोकांचं लक्ष हटेल, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
... तर राज्यपालांकडे जाण्याची वेळ येणार नाही
राज्यपाल शोभेची वस्तू नाहीत किंवा कटपुतली नाही. त्यांना संवैधानिक अधिकार आहेत. शिवसेनेनं सरकारमध्ये असताना कर्जमाफीचं निवेदन राज्यपालांना दिले होते. मग आम्ही आता गेलो तर हरकत काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांना सांगून काम होणार असेल तर राज्यपालांकडे जाण्याची वेळच येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत
राहुल गांधी यांच वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कोरोनाच्या हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ढकलायची आणि बाजूला व्हायचं, असं यातून दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, अशा वेळेस मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत असं लक्षात येत आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Maharashtra Politics| महाविकास आघाडीचं सरकारबद्दला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य