(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची संघ आणि विश्व हिंदू परिषदेवर टीका
राममंदिर हा राजकीय मुद्दा बनू नये व मोदी परिवारास यावर लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत असे आता एकंदरीत दिसते. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय् स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेवर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणुकांनंतर राम मंदिराच्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाईल, या विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल. त्यावेळी सरकार कुणाचंही असलं तरी राम मंदिर बांधणार, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. संघाच्या या भूमिकेचाही समाचार घेतला आहे.
राममंदिराबाबत मोदी सरकारची टोलवाटोलवी
शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, अयोध्येतील राममंदिराबाबत मोदींचे सरकार टोलवाटोलवी करीत आहे. आता विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मंदिराच्या बाबतीत अंगचोरक्या सुरू केल्या आहेत. केंद्रात कोणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर ‘संघ’ राममंदिर उभारणीस सुरुवात करेल असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने नेमकी हीच भूमिका मांडली. याचा अर्थ असा की, राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे.
2019 च्या निवडणुकीत राममंदिर हा अडचणीचा मुद्दा मोदी परिवारासाठी ठरू नये. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय? राममंदिर हा राजकीय मुद्दा बनू नये व मोदी परिवारास यावर लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत असे आता एकंदरीत दिसते. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार? मोदी सरकारने 2019 च्या आधी अध्यादेश काढून अयोध्येत राममंदिर उभारणी सुरू करावी अशी श्री. मोहनराव भागवंतांचीच मागणी होती. विश्व हिंदू परिषदेने देशभरात ज्या सभा धर्म संसदेच्या नावाखाली घेतल्या. त्यातील ही मागणी अयोध्येतील राममंदिरासाठी अध्यादेश काढावा हीच होती. धर्म संसदेचा दबाव असाही होता की, मंदिर निर्माणाची तारीख सांगा, याची आठवण शिवसेनेनं अग्रलेखातून करुन दिली.
आपण शिखरावर विराजमान झालो आहोत ते राममंदिराचे राजकारण केल्यामुळेच. त्यामुळे आता राजकारण नको हा नवीन जुमला काय आहे? 2019 च्या निवडणुकांत बहुमत मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नितीश कुमार, रामविलास पासवान यांची राममंदिराबाबतची भूमिका नेमकी काय? त्यांना राममंदिर हवे की नको? हे आताच समजून घेतले पाहिजे, असही सामानातून शिवसेनेनं म्हटलं आहे.