Maharashtra Income Tax Raids : कारखान्यांवर झालेल्या धाडसत्रांबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया..
राज्यातील साखर कारखान्यांवर झालेल्या धाडसत्रांबाबत शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशच्या घटनेवर भूमिका घेतल्यामुळे सत्ताधाऱ्यांना राग आल्याची शक्यता : पवार.
![Maharashtra Income Tax Raids : कारखान्यांवर झालेल्या धाडसत्रांबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया.. Sharad Pawar's first reaction about the raids on factories Maharashtra Income Tax Raids : कारखान्यांवर झालेल्या धाडसत्रांबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया..](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/01/04101810/sharad-pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स (Income tax) विभागाने छापे मारले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या ऐकण्यात आलं की माझे पुतणे अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने कारवाई केली. माझ्या मते आता जे काही घडलंय ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, त्याचा परिणाम असू शकतो, असा टोला पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील घटकांची वाहने त्यांच्या अंगावर जातात आणि त्यामध्ये काही शेतकरी चिरडून ठार होतात. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं, साहजिकच याचा सर्वांनी निषेध केला. महाराष्ट्र सरकारनेही मंत्रीमंडळ बैठकीत निषेध केला. मीही याबद्दल तीव्रतेने बोललो. याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग जे कुणी सत्ताधारी पक्षातल्या लोकांना आलाय. त्याच्या प्रतिक्रिया म्हणून आता जे काही चाललंय त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मी अजित पवार यांचं विधान वाचलं. कर वसुली करण्यासाठी जर त्यांना काही शंका येत असेल. तर त्यासंबंधीच्या चौकशी करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा. त्या संस्था किंवा त्याच्याशी संबंधित प्रमुख असतील त्यांच्यासाठी. परंतु, या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवरही (अजित पवार यांच्या बहिणींच्या घरांवर छापे) छापे टाकणं हा या अधिकाराचा अतिरेक आहे. साहजिकच लोकांनीच विचार असा केला पाहिजे की या प्रकारे अधिकाराचा गैरवापर हा किती दिवस सहन करायचा. काही लोक याबद्दल वेडीवाकडी भाष्य करुन, आरोप करुन काहीही बोलतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सीज त्याबद्दल कारवाई करण्यासाठी पुढे येतात हे सर्वात आक्षेपार्ह आहे.
अजित पवार काय म्हणाले?
आयकर विभागाने कुठे छापेमारी करावी हा त्यांचा निर्णय आहे. माझ्या संबंधित असलेल्या कंपन्यांचे सर्व कर वेळेवर भरले जातात. मी स्वत: अर्थमंत्री असल्यानं याची काळजी घेतो. आता ही रेड इन्कम टॅक्स विभागाने राजकीय हेतूपोटी टाकली याबाबत तेच सांगू शकतील. माझ्या नातेवाईकांच्या संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आता ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचं मला वाईट वाटतं, असं अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)