मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, परळ टर्मिनसचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण
तब्बल 51 कोटी रुपये खर्च करुन हे टर्मिनस बांधण्यात आले आहे. तसेच यावेळी रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी सुविधांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीत 22 जणांचा बळी गेल्यानंतर एक वर्षातच दिवसरात्र काम करुन परळ टर्मिनसचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडलेल्या परळ टर्मिनसचं आज रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. परळ टर्मिनसमुळे अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 16-16 लोकल चालविण्यात येणार आहेत. यावेळी रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते परळ टर्मिनसहून सुटणाऱ्या परळ लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
तब्बल 51 कोटी रुपये खर्च करुन हे टर्मिनस बांधण्यात आले आहे. तसेच यावेळी रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी सुविधांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीत 22 जणांचा बळी गेल्यानंतर एक वर्षातच दिवसरात्र काम करुन परळ टर्मिनसचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
काय बदल करण्यात आले?
नवीन रेल्वे रुळ टाकून कल्याणकडे जाणारी नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे. फलाट क्रमांक 2 अ ही टर्मिनस मार्गिका आणि फलाट क्रमांक 3 चे रुंदीकरण केले आहे. दोन्ही फलाटावर संरक्षित छत टाकले आहे. 12 मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम जोडणारे पादचारी पूल, सरकते जिने, उदवाहक अशा सुविधा प्रवाशांसाठी येथे उपलब्ध आहेत.
परळ टर्मिनस पश्चिम रेल्वे मार्गाला जोडत असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे सोपे होईल. परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी 8.38 मिनिटांनी चालविण्यात येईल. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 11.15 वाजता सुटेल.
किती लोकल परळहून सुटणार?
सध्या दादर स्थानकात येणाऱ्या अनेक लोकल सेवा आहेत. त्यापैकी 32 सेवा परळ स्थानकातून सोडण्यात येतील. ज्यात 16 डाउन आणि 16 अप सेवा आहेत. परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी 8.38 मिनिटांनी चालविण्यात येईल. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 11.15 वाजता सुटेल. कल्याणहून परळ टर्मिनसकडे सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी रवाना होईल. तर शेवटची लोकल कल्याणहून 9 वाजून 52 मिनिटांला परळ टर्मिनसकडे रवाना होणार आहे.