एक्स्प्लोर
अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध, पोलिसांचा दावा
लेखक वरवर राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचंही अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांनी म्हटलं.
मुंबई : देशभरात सुरु असलेल्या नक्षली संबंधाच्या कारवाईवरुन महाराष्ट्र पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. तशी हजारो पत्रं मिळाली आहेत. त्या पत्रांमध्ये नक्षलवाद्यांना मदत, पैसा, हत्यारांचा उल्लेख आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. इतकंच नाही तर माओवाद्यांचा सरकारविरोधी युद्ध पुकारुन, सरकार उलथवण्याचा डाव होता, असा दावाही पोलिसांनी केला.
लेखक वरवर राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचंही परमवीर सिंह यांनी म्हटलं.
या पाचही जणांच्या घरी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याची न्यायवैद्यक तपासणी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच काही कम्प्यूटर्स, लॅपटॉपचे पासवर्ड मिळवले असून, या सर्व कागदपत्रांवरुन मोठा शस्त्रसाठा विकत घेणं, पंतप्रधान मोदींची हत्या आणि मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, हे स्पष्ट होत असल्याचंही सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
पत्रं वाचून दाखवली
या पत्रकार परिषदेत पोलिसांनी जप्त केलेली पत्रं वाचून दाखवली. यामध्ये कॉम्रेड सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे, रोना विल्सन यांच्या पत्रांचा समावेश होता. या पत्रांमध्ये नक्षलवादी चळवळीसाठी कसा प्लॅन करता येईल, पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी, हत्यारा याबाबतचा उल्लेख असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सुधा भारद्वाज यांच्या पत्रातील मुद्दा
प्रोफेसर साईबाबाला शिक्षा झाल्यानंतर संघटनेच्या शहरी भागात काम करणाऱ्या कॉमरेड्समध्ये दहशत निर्माण झालेली आहे. ती कमी करण्यासाठी काश्मिर मधे फुटीरतावाद्यांकडून तिथल्या अतिरेकी संघटना, त्यांचे नातेवाईक आणि दगडफेक करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजच्या धर्तीवर आपण आपल्या शहरी आणि ग्रामिण भागातल्या कॉमरेड्साठी त्यांच्या कामानुसार पॅकेज निश्चित केलं पाहीजे. त्यामुळे हे लोकं आपल्या संघटनेसाठी पूर्णपणे समर्पण भावनेनं काम करत राहतील आणि काम करतांना होणाऱ्या दुर्घटना किंवा कायदेशीर अडचणींना तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतील
कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडेंचं पत्र
येत्या काही दिवसा मोठी कारवाई करावी लागेल ज्यामुळे आपल्याला जास्त प्रसिद्धी मिळेल. कॉम्रेड वरवर राव आणि कॉम्रेड सुरेंद्र यांनी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आणि जंगलातील कॉम्रेडपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी कॉम्रेड सुरेंद्र गडलिंग यांच्यावर मोठ्या कामाची जबाबदारी सोपवली आहे. त्यासाठी कॉम्रेड वरवर रावने काही फंड/पैसे पुरवला आहे. ज्यातील काही पैसा कॉम्रेड सुरेंद्र तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तुम्ही त्यांच्या संपर्कात राहून कारवाई करा. 80 गाड्या जाळल्या होत्या, त्या वरवर राव यांच्या सांगण्यावरुन झाल्या होत्या. त्याबाबतच उल्लेख या पत्रात आहे, असं पोलिसांनी सांगितलं. फरार असलेल्या मिलिंद तेलतुंबडे यांनी हे पत्र महाराष्ट्र झोनल कमिटीला लिहिलं आहे.
जम्मू काश्मीर, मणिपूर, फुटीरतावाद्यांशी संबंध
काही पत्र आहेत आमच्याजवळ ज्यामध्ये आरोपींचा जम्मू काश्मीरमध्ये भूमिका असल्याचा उल्लेख आहे. जम्मू काश्मीरमध्ये कशाप्रकारे दगडफेक करणाऱ्या एकत्र आणलं जातं, तशाच कल्पना देशभरात कसं राबवता येईल असंही पत्रात लिहिलं आहे. अटकेतील सगळ्यांचा मणिपूर, जम्मू काश्मीर आणि फुटीरतावाद्यांशी संबंध आहे, असंही पत्रात नमूद केलं आहे.
JNUच्या विद्यार्थ्यांना जंगलात ट्रेनिंग
परमवीर सिंह म्हणाले की, "देशभरातून ज्या आरोपींना आम्ही अटक केली होती, ते कशाप्रकारे भूमिगत चळवळीच्या संपकार्त होते, त्यांचा अजेंडा राबवत होते, लोकांचं ब्रेनवॉश करत होते, तसंच जेएनयूच्या विद्यार्थ्यांना जंगलात भूमिगत कामासाठी पाठवलं जात होतं. कशाप्रकारे त्यांना पैसा पुरवला जात होता, जेणेकरुन सरकार पाडता येईल, सरकारविरोधात एकप्रकारचं युद्ध पुकारणाचा नक्षलवाद्यांचा जो हेतू आहे, त्यामध्ये कशाप्रकारे हे लोक मदत करत होते, त्याचा संपूर्ण उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे."
नक्षल संबंधावरुन अटक, पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
जम्मू काश्मीरमध्ये आरोपींचे फुटीरतवाद्यांशी संबंध असलेले काही कागदपत्र आमच्याकडे आहेत : पोलीस
काश्मीर, मणिपूरमधील फुटीरतावाद्यांशीही संपर्क साधल्याचे पुरावे - पोलीस
नक्षली कारवायांसाठी विविध स्तरावरुन पैशाचा पुरवठा, हजारो पत्र आहेत- पोलीस
शहरी नक्षलवाद नवा नाही, मी 20 वर्षापूर्वी चंद्रपूर-भंडाऱ्यात काम केलंय, तेव्हापासून शहरी नक्षलवादाविरोधात काम - पोलीस
फरार असलेल्या मिलिंद तेलतुंबडेने रोना विल्सनला लिहिलेल्या पत्रात नक्षली कारवांयाबाबत थेट उल्लेख - पोलीस
जेएनयूमधूनही विद्यार्थ्यांना नक्षलवादी चळवळींकडे वळवण्याचा प्रयत्न - पोलीस
हजारो पत्रं मिळाली, ज्यामध्ये नक्षलवाद्यांना मदत होत होती, हे सिद्ध होतंय - पोलीस
रोना विल्सन यांचं पासवर्ड संरक्षित पत्रही हाती लागलं, त्यातून महत्त्वाचे खुलासे - पोलीस
रोना विल्सन यांनी 4 लाख राऊंड, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा उल्लेख असलेलं पत्र कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलं होतं. यामध्ये राजीव गांधीसारखा घातपाताचा उल्लेख - पोलीस
कॉ. सुदर्शन यांनी कॉम्रेड गौतम नवलखा यांना लिहिलेलं पत्रही पोलिसांनी वाचून दाखवलं
कॉ. सुधा भारद्वाज यांचं संशयास्पद पत्र पोलिसांनी वाचून दाखवलं
नक्षल संबंधावरुन 29 तारखेला देशभरात छापेमारी केली, त्यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र मिळाली - पुणे पोलीस
पोलिसांची पत्रकार परिषद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement