Mumbai Crime : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत, समज देऊन सोडलं
Mumbai Crime : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टेटस स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईत दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची (Pakistan Independence Day) स्टेटस स्टोरी इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईत (Mumbai) दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील कुलाबा पोलिसांनी (Colaba Police) ही कारवाई केली. अटकेतील दोन्ही तरुण हे 19 वर्षांचे असून महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. कायदेशीर कारवाई केल्यानंतर दोघांनाही समज देऊन सोडण्यात आलं.
कुलाबा मार्केटमधील व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर दोन तरुण ताब्यात
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा मार्केटमधील काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टेटस स्टोरी पोस्ट केली आहे, यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार 14 ऑगस्ट रोजी कुलाबा मार्केटमधीलच एका व्यापारी असलेल्या प्रथमेश चव्हाण यांनी पोलिसांत नोंदवली होती. त्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्याच्या एटीएस पथकाने सोमवारी रात्री उशिरा कुलाबा मार्केटमध्ये जाऊन संबंधित दोन तरुणांना शोधलं आणि ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणलं.
मोबाईल फोन जप्त केले
पोलिसांनी त्यांचे मोबाईल तपासले आणि या मुलांनी खरोखरच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी स्टेटस म्हणून केला होता असं दिसलं. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीन शॉट घेऊन ते ताब्यात घेतले. "या दोघांच्या वागण्या-बोलण्यावरुन त्यांना 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिनाला देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा उद्देश होता, असं दिसत होतं," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई, समज देऊन सोडलं
दरम्यान, यानंतर दोन्ही तरुणांवर सीआरपीसी (CrPC) कलम 151(3) अन्वये प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई करण्यात आली आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी या संदर्भातील माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन दोन्ही तरुणांनाही सोडून देण्यात आलं. ही अटक प्रतिबंधात्मक स्वरुपाची होती आणि दोघांना समज दिल्यानंतर सोडण्यात आलं.
पुण्यातील कोंढव्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप, दोघे अटकेत
दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्यदिनी पुण्यातील कोंढवा परिसरात कथितरित्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (15 ऑगस्ट) दोघांना अटक केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अकबर नदाफ आणि तौकीर अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.मात्र, अशा घोषणा खरोखरच दिल्या होत्या का, याचा तपास पोलीस करत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दोन्ही आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची तक्रार स्थानिकांनी 14 ऑगस्टच्या संध्याकाळी दिली होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा