मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या रिंगणात उतरणार, भाजपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही नक्की निवडणूक लढू. मात्र निवडणुकांच्या आधी आमच्या मान्य झाल्या तर निवडणुका लढण्याचा प्रश्नच नाही.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मराठा आपल्या विविध मागण्यांसाठी मोठं आंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनादरम्यान भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाने उघड नाराजी व्यक्त केली.
आगामी निवडणुकीत भाजपवर बहिष्कार घालणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केलं. याशिवाय जिथे जमेल तिथे भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करु, अशी घोषणाही मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत केली. भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही नक्की निवडणूक लढू. मात्र निवडणुकांच्या आधी आमच्या मान्य झाल्या तर निवडणुका लढण्याचा प्रश्नच येत नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 2 ते 3 जागा, पंढरपुरातील आणि ठाणे येथील एका जागेची चाचपणी सुरु आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात 40 जागांवर आम्ही चाचपणी करत असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाने दिली.
कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यातील आरक्षणाची मागणी वगळता अन्य सरकारने अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त करत मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
व्हिडीओ-