Kalyan : कोळशेवाडी पोलिसांची दबंगगिरी वादाच्या भोवऱ्यात; मारहाणीत दुचाकीस्वार गंभीर जखमी
नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.
कल्याण : आपल्या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असणारे कोळसेवाडी पोलीस ठाणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. नाकाबंदी दरम्यान दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यावर पोलीस कर्मचाऱ्याने काठीनं मारलं. काठी तरुणाच्या डोक्यावर लागल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली .कल्याण पूर्व तिसगाव नाक्यावर ही घटना घडली. जखमी तरुणाचे नाव निलेश कदम असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला असता सुरुवातीला पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं सांगितलं, मात्र कॅमऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला .
निलेश कदम, भुपेंद्र झुगरे हे दोघे काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने कल्याण पूर्व येथून फटाके आणण्यासाठी उल्हासनगरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान, तिसगाव नाका येथे कोळशेवाडी पोलिसांची चेकिंग सुरु होती. निलेश व भुपेंद्र दुचाकीवरुन जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या हातातील काठीने निलेश याच्या डोक्यावर मारले. डोक्याला लागल्याने निलेशला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यास गेलो असता पोलिसांनी नोंद करून घेतली नाही, तुमच्या उपचाराचा खर्च करतो विषय वाढवू नका असे पोलिसांनी सांगितल्याचा आरोप जखमी तरुणाने केलाय. या प्रकरणी पोलिसांनी मात्र सुरुवातीला चुप्पी साधत टाळाटाळ केली त्यानंतर चौकशी सुरु असल्याचे सांगितले. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय. कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी पोलीस ठाणे त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असते. आता या प्रकरणामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- अनधिकृत बांधकामांविरोधी कारवाई थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्र्याचा फोन, ठाणे महापौरांच्या वक्तव्यानं गदारोळ
- IPL 2021 PBKS vs RR: रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर 2 धावांनी विजय; अखेरच्या षटकात कार्तिक त्यागीने मॅच फिरवली
- तरुणाचा लग्नाआधीच विश्वासघात! साखरपुडा झाल्यानंतर मुलीच्या फोनमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ