तरुणाचा लग्नाआधीच विश्वासघात! साखरपुडा झाल्यानंतर मुलीच्या फोनमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ
अमेरीकेत राहणाऱ्या भारतीय तरुणाचा लग्नाआधीच विश्वासघात झाल्याची घटना घडली. या प्रकरणात पिंपरीतल्या मुलीविरोधात सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टात खटला दाखल करण्यात आलाय.
मुंबई : विवाह संकेतस्थळावरुन पिंपरीत राहणाऱ्या मुलीशी लग्न जमलेल्या तरुणाने साता समुद्रापारहून येत साखरपुडा उरकला. मात्र, लग्नाआधीच विश्वासघात झाल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात तरुणाने थेट अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टात दाद मागितली आहे.
मिलिंद बोरकर असे या तरुणाचे नाव असून तो 14 वर्षांपासून अमेरिकेत काम करत आहे. स्वतःच करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्याने भारतात येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये बोरकर याने आपल्या स्वप्नातल्या परीचा शोध सुरू केला. फेब्रुवारी 2019 मध्ये हा शोध पूर्ण झाला. मिलिंदने भारत मॅट्रिमोनी साइटवर पिंपरीत राहणाऱ्या पल्लवी गायकवाड नावाच्या एका मुलीला पसंत केलं. मॅट्रिमोनी साइटवर दोघांचं बोलणं सुरू झालं ते एकमेकांच्या जवळ आले. मिलिंद साता समुद्रापलीकडे आपल्या मनासारख्या मुलीसोबत लग्न करून आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहू लागला.
16 एप्रिल 2019 मध्ये मिलिंद भारतात आला आणि ऑनलाइन भेटीनंतर पहिल्यांदा तो पल्लवीला भेटला. कुटुंबांच्या संमतीने दोघांच्या लग्नाची बोलणी झाली. 2 जून 2019 ला मिलिंद आणि पल्लवी गायकवाडचा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर मिलिंद लग्नाच्या तयारीला लागला. होणार्या बायकोला अमेरिकेत नेण्यापासून ते अमेरिकेत ज्या घरात दोघे राहणार होते, त्या घरात सुखी संसारासाठी लागणार्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याची तयारी मिलिंदने सुरू केली.
ही सगळी तयारी करत असताना मिलिंदला त्याची होणारी बायको पल्लवी गायकवाडच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले. ज्यानंतर मिलिंदच्या पायाखालची जमीनच सरकली. मिलिंदने अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेनुसार साखरपुड्यानंतर 21 जुलै 2019 ला मिलिंदला त्याची होणाऱ्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याचे समजले.
मिलिंदला मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले होते जे त्याने याचिकेसोबत कोर्टात सादर केले आणि त्यानंतर त्याने साखरपुडा मोडला. साखरपुडा मोडल्यानंतर पल्लवीने मिलिंदवर खोटं बोलण्याचा आरोप लावत त्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत असल्याचे मिलिंदने सांगितले.
मिलिंदने सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टात युक्तिवाद केला की 10 नोव्हेंबर 2019 मध्ये तो अमेरिकेला काम करण्यासाठी परतला. तोपर्यंत त्याच्यावर भारतात कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. मात्र, पल्लवी गायकवाडने अमेरिका आणि भारतातील इमिग्रेशन सोबतच मिलिंदच्या ऑफीसमध्ये पत्र लिहून मिलिंदला गुन्हेगार म्हटलं आहे. 2 फेब्रुवारी 2020 ला मिलिंदने सॅन फ्रान्सिस्को सुपीरियर कोर्टात पुराव्यात फोटो, व्हिडिओ आणि चॅट जमा केले आहेत. कोर्टात लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
तर दुसरीकडे 27 डिसेंबर 2019 रोजी मुंबई येथे मिलिंदच्या वडिलांनी अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात पल्लवी, पल्लवीचे वडील चंद्रकांत आणि काका संजीव यांच्याविरोधात फसवणुकीचा आणि गुन्हेगारी संदर्भात केस दाखल केली आहे. कोर्टाने संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तर मिलिंदच्या वडिलांनी दिंडोशी कोर्टातही सिविल सुट दाखल केली आहे.