एक्स्प्लोर
Advertisement
आमच्या जिवाला धोका, सुरक्षा वाढवा; जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांची मागणी
आमच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे आमची सुरक्षा वाढवा अशी मागणी महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (5 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं दोन्ही नेत्याचं म्हणणं आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आपल्या घराचीही रेकी करण्यात आली होती. मात्र भाजप सरकारने आवश्यक सुरक्षा पुरवली नव्हती. त्यामुळे आपल्या जिवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका पाहता, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मंत्रिमंडळ बैठकीत हिंगणघाट जळीतकांडसह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, "मागील सरकारने त्यांची सुरक्षाव्यवस्था कमी केली होती. तसंच दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर काही संघटनांनी त्यांच्या घराचीही पाहणी केल्याचे पुरावे समोर आले होते. त्यामुळे काही कट्टर संघटनांचे हेतू लक्षात घेता आपली सुरक्षा वाढवावी." जितेंद्र आव्हाड यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या अहवालात काही आढळल्यास यासंदर्भात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement