अंतिम वर्षाच्या व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कुलगुरुंसोबतच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
परीक्षा हवी की नको? याबाबत पर्याय न देता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना क्लास इंम्प्रूव्हमेंट, ग्रेड सुधारणा करण्यासाठी पर्याय दिला जाणार आहे.
मुंबई : यूजीसीने सुधारित गाईडलाईन देशातील विद्यापीठांना दिल्यानंतर परीक्षा या सप्टेंबर अखेरीस घेतल्या जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर यूजीसीच्या या गाईडलाइन्स सर्वांना धक्का देणाऱ्या असून राज्य सरकार आपल्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं असून त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहले आहे. मात्र, या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असताना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एटीकेटी- बॅकलॉग व अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत काही महत्वाच्या निर्णयावर सूचना मागील आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठातील कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत घेतल्या आहेत.
यामध्ये एटीकेटी- बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बैठकीत दिलेल्या महत्वाच्या सूचनामध्ये ज्या सत्रात विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा काही विषयात एटीकेटी असेल त्याच सत्रातल्या सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे 50 टक्के गुण व त्यासोबत त्याच सत्रातील अनुत्तीर्ण, एटीकेटी असलेल्या विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे 50 टक्के गुण घेऊन यामध्ये येणाऱ्या गुणांची बेरीज करून अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विषयाचे गुण दिले जावे, याबाबत निर्णय घेतला गेला आहे. तर ज्या विषयाला अंतर्गत मूल्यमापनाचे गुण नाहीत त्या सत्रातील सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा सरासरीसाठी पूर्ण 100 टक्के विचार करून एटीकेटीच्या विषयाचे गुण देऊन निकाल जाहीर करावा. त्यामुळे, सध्याच्या कोविड-19 ची परीस्थिती पाहता एटीकेटीच्या ऑनलाईन -ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कुलगुरूंनी मत मांडल्यानंतर हा अशा प्रकारे एटीकेटी-बॅकलॉगच्या विद्यार्थ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.
वरील सूत्र वापरल्यानंतर अंतिम वर्षाचा निकाल हा इतर सर्व विषयात आतापर्यंत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयात ज्याप्रकारे परीक्षा रद्द करून विद्यापीठ ज्या सूत्राचा सरासरी गुणांसाठी वापर करेल त्या वापरलेल्या सूत्रांनी जाहीर करण्यात येणार आहे. शिवाय, हे सर्व विद्यार्थ्याचे निकाल हे 31 ऑगस्टपर्यत जाहीर करण्यात यावेत, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आल्या आहेत. 19 जून रोजी घेतलेल्या राज्य सरकारच्या शासन निर्णयात सर्व सत्रात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याचा निकाल विद्यापीठाने ठरवलेल्या सूत्रानुसार जाहीर होणार आहे.
त्यासोबतच आधीच्या घेतलेल्या शासन निर्णयात मोठा बदल करत सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा हवी की नको? याबाबत पर्याय न देता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना क्लास इंम्प्रूव्हमेंट, ग्रेड सुधारणा करण्यासाठी पर्याय दिला जाणार आहे. मात्र या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कधी होतील? होतील की नाही? याबाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांना ही बाब विद्यापीठाने निदर्शनास आणून द्यावी, अस सांगण्यात आलं आहे. शिवाय, अंतिम वर्ष सोडून इतर वर्षाच्या एटीकेटी आणि बॅगलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत याच सूत्राचा अवलंब करण्याचा या बैठकीत सुचवण्यात आलं आहे.
या निर्णयावर ठाम असताना यूजीसीच्या गाईडलाईन्स या राज्याला बंधनकारक नसताना जरी यूजीसीने परीक्षा घेण्यास सांगितले तर कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन त्या परीक्षा कशा घेतल्या जातील याबाबत मार्गदर्शन तत्वे यूजीसीने आम्हाला पाठवावे, अशी मी विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. शिवाय, याबाबत उदय सामंत हे उद्या दुपारी परीक्षेबाबतच्या निर्णयावर सविस्तर बोलणार असून आपली भूमिका सर्वांसमोर मांडतील.
संबंधित बातम्या
युजीसीच्या सुधारित गाईडलाइन्सनुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार
Uday Samant On UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम : उदय सामंत