एक्स्प्लोर
कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 6 नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. पक्षाकडून सूचना मिळाल्याशिवाय महापालिका सभागृह किंवा कोणत्याही बैठकीत मतदान करु नये. मतदान केल्यास पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे आदेश मनसेकडून व्हीपद्वारे देण्यात आले आहेत.

मुंबई : काही कुत्री मागून भुंकत असतात, त्यांना भुंकू दे. मी हत्तीची चाल चालत राहीन, असं उत्तर मनसेमधून शिवसेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी त्यांच्या टीकाकारांना दिलं आहे. मनसेचे जे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले, त्यांच्यापैकी एक दिलीप लांडे आहेत. "एखादया लोकप्रतिनिधीला जर जनतेचा आशीर्वाद असेल, तर त्याला काही लोक बदनाम करायचं काम करतात. मागे कोण कुत्री भूंकतात, त्यांना कधी भीक घातलेली नाहीय. मी हत्तीसारखी चाल चालत असतो", असे दिलीप लांडे म्हणाले. एसीबीकडे केलेल्या तक्रारीसंदर्भात बोलताना दिलीप लांडे यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. "मनसेने काढलेल्या व्हीपचं पत्र माझ्याकडे आलेलं नाही आणि या व्हीपला अर्थ नाही. कोणी कुठं बसावं याबद्दल असं काही नाही, कोणीही कुठं बसू शकतो.", असेही दिलीप लांडे म्हणाले. शिवाय, "शिवसेनेत आल्याचा पश्चाताप नाही, उलट मनसेत पश्चाताप होत होता. म्हणून पक्ष सोडला आणि इकडे आलो.", असे सांगत दिलीप लांडेंनी त्यांच्या सेनाप्रवेशावर भाष्य केले. मनसेकडून व्हीप जारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 6 नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. पक्षाकडून सूचना मिळाल्याशिवाय महापालिका सभागृह किंवा कोणत्याही बैठकीत मतदान करु नये. मतदान केल्यास पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत. सहाही नगरसेवक शिवसेनेतच! दरम्यान, शिवसेनेत गेलेले नगरसेवक पुन्हा मनसेत येणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. मात्र हा दावा शिवसेनेने खोडून काढला. तसंच शिवसेनेत आलेले मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी स्वत: पत्रक काढून आम्ही शिवसेनेत असल्याचं सांगितलं. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेने नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. मात्र व्हीपचं पत्र आपल्यापर्यंत पोहोचलं नसल्याचं दिलीप लांडे यांनी स्पष्ट केले आहे. दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार? मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती.
आणखी वाचा























