राम मंदिराच्या मुद्यावरुन देशात दंगली घडवण्याचा कट : राज ठाकरे
हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करायचं आणि मतं मागायची हा एककलमी कार्यक्रम सध्या या सरकारचा असणार आहे, त्यामुळे सतर्क राहा, असं आवाहन राज ठाकरेंनी यावेळी केलं.

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन ओवेसींसारख्या लोकांना हाताशी घेऊन दंगली घडवण्याबाबत बोलणी सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लीम दंग्यांवर निवडणूक जिंकायची आहे, असा घणाघातही राज ठाकरेंनी केला आहे. मुंबईतील विक्रोळी महोत्सवात राज ठाकरे बोलत होते.
"आज मला दिल्लीवरून समजलेली बातमी अतिशय गंभीर आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये देशात राम मंदिरच्या मुद्द्यांवरुन दंगली घडविण्यासाठी ओवेसींसारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत. कारण या सरकारने गेली साडेचार वर्ष काम विकासकामं केली नाहीत. त्यामुळे दाखवण्यासारखं काही नसल्याने या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लीम दंगली घडवून निवडणूक लढवायची आहे", असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
"राम मंदिर व्हायला पाहिजे, मात्र ते 2019 च्या निवडणुकीनंतर व्हायला पाहिजे. परंतु हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करायचं आणि मतं मागायची हा एककलमी कार्यक्रम सध्या या सरकारचा असणार आहे, त्यामुळे सतर्क राहा", असं आवाहन राज ठाकरेंनी यावेळी केलं.
"महाराष्ट्रात आणि देशात वाढलेली बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण देशाचं राजकारण भलत्याच विषयांकडे वळवण्याचा कट आखला जात आहे. ज्यामुळे मूळ प्रश्न बाजूला व्हावेत आणि लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून पुन्हा सत्तेत यावं हा उद्देश या सरकारचा आहे, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.























