मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची जोरदार हजेरी
मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे.
मुंबई : मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आठवड्याच्या सुरुवातीलाच त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
चेंबुर, सायन, कुर्ला, हिंदमाता परिसरात नेहमी प्रमाणे पाणी साचलं आहे. चेंबुरमध्ये काही घरांमध्येही पाणी शिरलं. याच भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळून वाहनांचं नुकसान झालंय.
दक्षिण मुंबईसह विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड या उपनगरात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरातही पाणी साठल्याने नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे.
मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. पाणी साचण्याच्या घटनांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अडचणींमध्ये भरच पडणार आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई उपनगरात 24 तासात 231 मिमी पावसाची नोंद झाली.
ठाण्याच्या सहयोग मंदिर, कल्पना सोसायटी परिसरात मुसळधार पावसाने पाणी साचलं. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं. पंप लावून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे. याशिवाय ठाण्याच्या पोखरण रोड भागात मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन कार आणि एका बाईकचं नुकसान झालं आहे.
रेल्वेची तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिरानं
मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. कुर्ला, सायन आणि ठाणे स्टेशनवर ट्रॅकवर पाणी साचलं आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक 20-25 मिनिटे उशिराने होत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.