'राईस पुलर' धातूचा वापर करून लोकांना गंडा; चौघांना अटक
कॉपरच्या या राईस पुलर नावाच्या भांड्याच्या मदतीने सॅटेलाईन सिंग्नलचे सुद्धा काम करण्यात येते, अशी भंपक बतावणी आरोपींनी लोकांना केली होती. मात्र अखेर या कारस्थानाचा खुलासा झाला आणि चारही आरोपी तुरुंगात गेले आहेत.
!['राईस पुलर' धातूचा वापर करून लोकांना गंडा; चौघांना अटक Four members of rice puller gang arrested in Mumbai 'राईस पुलर' धातूचा वापर करून लोकांना गंडा; चौघांना अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/04134519/Rice-Cooler.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गेल्या 6 महिन्यांमध्ये मुंबईत राईस पुलरच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करण्याचे प्रयत्न सुरू होते. आतापर्यंत अनेक जणांना बळीचा बकरा बनवून या भामट्यांनी लाखो रुपये लाटल्याचा माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जात आता एक मोठा खुलासा गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. हा सगळा घोटाळा ज्या राईस पुलरच्या नावाखाली केला जात होता, ते कॉपरचे भांडे आता गुन्हे शाखेच्या हाती लागले असून रिझर्व बँक आणि इतर होम मिनिस्ट्रीच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून लोकांना लुबाडणाऱ्या 4 जणांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
तांब्याचं भलं मोठं भांड किरकोळ नसून यामध्ये वैज्ञानिक शक्ती आहेत, म्हणून त्याची किंमत हजारो कोटी रुपये आहे, असं लोकांना सांगण्यात आलं होतं. या भांड्यासाहित असणारी ही कागदपत्र सुद्धा देशातल्या महत्वाच्या संस्थेची असून आरबीआय आणि होम मिनिस्टरीच्या नावाची आहेत. कॉपर इरिडियाम राईस पुलिंगचे हे भांडे तब्बल 39 हजार कोटी रुपयांना परदेशी नागरिकांना विकण्यात आले असून त्याची किंमत रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यात आले, पण ती काढण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा टॅक्स भरावा लागेल, अशी बतावणी करून ते भरण्यासाठी अनेक लोकांना या भामट्यांनी गंडा घातल्याचे समोर आलं आहे.
राईस पुलिंगच्या नावाखाली चाललेला हा खेळ आताचा नाहीये तर तो अनेक महिन्यापासून सुरू आहे. मात्र याचे धागेदोरे देशातल्या अनेक विभागात पसरले असण्याची दाट शक्यता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. नाशिक मधल्या एक समाजसेवकाला या भामट्यांनी बळीचा बकरा केलं आणि त्याच्याकडून तब्बल 10 लाख उकळण्याचा प्रयत्न केला तेव्हाच हा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या लक्षात आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
या राईस पुलिंगच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 4 जणांना अटक केलेली असून मुंबईसह कर्नाटक मधील बंगळुरू, गोकाक आणि तुमकूरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, या गुन्ह्यात महत्वाचा रोल असणाऱ्या त्या कॉपरच्या भांड्याला तांदूळ चिकटतात आणि त्यामुळे त्याची कोट्यवधी रुपये किंमत असून नासा आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या त्यावर टेस्टिंग करूनच त्याची खात्री करतात असं सांगण्यात आलं होतं. वास्तविक पाहता अशी कोणतीही गोष्ट खरी नसल्याने लोकांनी त्याला बळी पडू नये असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
कॉपरच्या या राईस पुलर नावाच्या भांड्याच्या मदतीने सॅटेलाईन सिंग्नलचे सुद्धा काम करण्यात येते, अशी भंपक बतावणी आरोपींनी लोकांना केली होती. मात्र अखेर या कारस्थानाचा खुलासा झाला आणि चारही आरोपी तुरुंगात गेले आहेत. मात्र जर असा प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत असेल तर वेळीच सावध होऊन जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)