उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांची भेट घेणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील. भाजप आणि शिंदे गटाचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची प्रथमच भेट होणार आहे.
Davendra Fadnavis to meet Raj Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता दादर इथल्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेतील. भाजप आणि शिंदे गटाचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची प्रथमच भेट होणार आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटू असं फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतर आज दुपारी दोन वाजता या दोघांची भेट होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं होतं तेव्हा राज ठाकरे यांनी पत्र लिहून त्यांचं जाहीर कौतुक केलं होतं. धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावीच लागते, अशा आशयाचं ते वक्तव्य होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेणार असं सांगितलं होतं. त्यानुसार आज या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.
राज ठाकरे यांनी शिवतीर्थ हे नवीन घर बांधलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी तिथे जाऊन पाहुणचार स्वीकारला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होत आहे. शिवसेना भाजपपासून दुरावल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री वाढलेली दिसते. आता शिवसेनेचा एक गट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीत काय चर्चा होते याची उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या