सर्वसामान्यांना दिलासा, आता सिटीस्कॅनचे दरही निश्चित होणार!
सध्या बहुतेक खासगी रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना कोरोना चाचणीसोबत पाहिलं सिटीस्कॅन करायला सांगितले जाते. मात्र सिटीस्कॅनचे दर वेगवेगळे असून सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे आता सरकारने सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठित केली आहे. यामुळे आता सिटीस्कॅनचे दरही निश्चित होणार आहेत.
मुंबई : कोरोनाच्या या संसर्ग आजाराच्या या वाढत्या संक्रमणात चाचणी करुन घेणे, त्याच्या निकालाची वाट बघत बसणे जिकीरीचे झाले असतानाच, डॉक्टर कोरोनाच्या चाचणीबरोबर (एचआरसिटी) फुफ्फुसांचा सिटीस्कॅन संशयित कोरोना रुग्णांना करायला सांगतात. त्या 10 ते 15 मिनिटाच्या सिटीस्कॅनवरुन वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णाला कोरोना आहे की नाही किंवा फुफ्फुसला किती इजा झाली आहे हे निदान करुन उपचार देणे सोपे होते. त्यामुळे सध्या बहुतेक खासगी रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना कोरोना चाचणीसोबत पाहिलं सिटीस्कॅन करायला सांगितले जात आहे. मात्र खासगी रुग्णालयात, तपासणी केंद्रात सिटीस्कॅनचे दर हे वेगळे असून सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, याकरिता सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे.
यापूर्वी शासनाने अशीच समिती स्थापन करुन कोरोनाच्या (आरटी-पीसीआर) या कोरोनाच्या चाचणीचे खासगी प्रयोगशाळेतील दर निश्चित केले होते. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याच पद्धतीने सिटीस्कॅनच्या बाबतीत शासन धोरण घेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सिटीस्कॅनचे दर हे रुग्णालय आणि तपासणी केंद्राच्या अनुषंगाने आणि कोणत्या साधनसामुग्रीचा वापर करुन केला जात असून वेगवेगळे आहेत. हे दर 3500-1200 पर्यंत असे आहेत.
याप्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना ते असे सांगतात की, "कोविड-19 च्या निदानासाठी सिटीस्कॅन (HRCT) चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT)चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅनचे कमाल दर निश्चित करण्यासंदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे."
सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT)चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅन चे कमाल दर निश्चित करणे संदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.2/2
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 15, 2020
कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या निदानात सिटीस्कॅनचे खूप मोठे महत्त्व आहे. सध्याच्या काळात बहुतेक श्वसनविकारतज्ञ या सिटीस्कॅनच्या रिपोर्टच्या आधारावर रुग्णांची उपचारपद्धतीबाबत निर्णय घेत आहे. या रिपोर्टमध्ये फुफ्फुसाच्या किती भागाला इजा झाली आहे, त्यावरुन त्याचे गुणांकन ठरत आहे. त्या गुणकांच्या आधारवर डॉक्टर उपचार सुरु करत आहे. अनेक वेळा जर रुग्ण गंभीर असेल तर कोरोनाच्या चाचणीचा अहवाल येण्याअगोदर डॉक्टर उपचार सुरु करतात. यामुळे रुग्णावर उपचार करण्याचा वेळ वाचतो. कारण सुरुवातीच्या काळात चाचणीचा निकाल येपर्यंत डॉक्टर वाट पाहत होते.