वांद्रे गर्दी प्रकरण; आशिष शेलार यांचं आदित्य ठाकरेंना पत्र
परप्रांतीय मजुरांच्या अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंबाबत समस्या आहेत. त्यासोबतच यामध्ये अत्यंत छोटा पण या कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचा नवा मुद्दा समोर आला आहे. या मजुरांचे मोबाईल रिचार्ज संपल्याने ते अस्वस्थ होते.
मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेर मंगळवारी जमलेल्या गर्दीच्या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. वांद्रे स्टेशन परिसरात बांधकाम मजूर आणि कामगारांचा जो जमाव गोळा झाला, त्यानंतर आज भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी या मजुरांच्या विविध संस्था-संघटना यांच्याशी संवाद साधला. त्यातून विविध बाबी व त्यांच्या अडचणी समोर आल्या त्याबाबत आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून हे मुद्दे सरकारच्या लक्षात आणून दिले आहेत.
अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूबाबत त्यांच्या समस्या आहेत. त्यासोबतच यामध्ये अत्यंत छोटा पण या कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचा नवा मुद्दा समोर आला आहे. यातील बहुतांश कामगार हे 'प्रीपेड मोबाईल' वापरतात आणि त्यांच्या मोबाईलचे रिचार्ज आता संपत आले आहेत. मोबाईल रिचार्ज सुरू करण्याची दुकाने सुरु नाहीत. ऑनलाईन रिचार्ज करणे सर्वांना शक्य नाही किंवा जमत नाही. त्यामुळे त्यांचा त्यांच्या गावाशी, नातेवाईक व मुकादमाशी असलेला संपर्क तुटू लागला आहे, त्यातून अस्वस्थता वाढते आहे. याबाबत काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी (14 एप्रिल) दुपारी वांद्रे स्टेशन बाहेरील जामा मशिदीच्या जवळ हजारो लोक जमले होते. यामध्ये अधिक परप्रांतीय मजूर होते. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या मजुरांची मागणी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सर्वांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केले. मात्र गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. त्यानंतर गर्दी नियंत्रणात आली. लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मे पर्यंत बंद आहे. राज्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातात कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न या मजुरांपुढे आहे. मात्र एवढी मोठी गर्दी याठिकाणी कशी जमली की ती जमवली होती. या अशा अनेक बाबींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
संबधित बातम्या
- Lockdown | रेल्वेचे बुकिंग कालपर्यंत का सुरु होतं?
- मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी
- Coronavirus | भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचलावा : मोदी
- corona lockdown | ज्येष्ठ नागरिकांनो घराबाहेर पडू नका, केंद्र सरकारची सूचनावली
Bandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी