Ratan Tata Dog : दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!
Ratan Tata Death in Mumbai: रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
मुंबई: सचोटी, प्रामाणिकपणा आणि विश्वासर्हता या आजच्या काळात दुर्मिळ झालेल्या मुल्यांची कसोशीने जपणूक करत टाटा समूह आणि भारतीय उद्योगक्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री निधन झाले होते. त्यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नरिमन पॉईंट येथील NCPA आणि वरळी स्मशानभूमीवर मोठी गर्दी झाली होती. रतन टाटा यांना शेवटचा निरोप देण्यासाठी नामवंत व्यक्ती आणि बड्या राजकारण्यांनी हजेरी लावली होती. यावेळी रतन टाटांना शेवटचं पाहण्यासाठी आलेला 'गोवा' नावाचा श्वानही अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.
रतन टाटा यांना दहा वर्षांपूर्वी हा श्वान गोव्यात सापडला होता.त्यामुळे त्याचे नाव गोवा ठेवण्यात आले होते. गोवा हा रतन टाटा यांच्या अत्यंत आवडता श्वान होता. रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गोवाला एनसीपीए येथे आणण्यात आले. त्यावेळी त्याची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली होती. त्यावेळी त्याला सांभाळणाऱ्या महिलेने गोवाला इथून जाऊ द्या, त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नाही, असे म्हटले.
गोवा रतन टाटांच्या पार्थिवाशेजारी रेंगाळला
रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉईंट येथील एनसीपीए येथे ठेवण्यात आले होते. गोवालाही टाटांच्या अंत्यदर्शनासाठी शवपेटीजवळ नेण्यात आले. त्याला रतन टाटा यांचा चेहरा दाखवण्यात आला. त्यानंतर गोवाला माघारी नेले जाणार होते. मात्र, गोवा काही केल्या रतन टाटा यांच्या पार्थिवाजवळून हटायला तयार नव्हता. तो बराचकाळ रतन टाटा यांच्या पार्थिवाजवळ बसून होता. अखेर काहीवेळाने गोवाला तिथून दुसरीकडे नेण्यात आले.
रतन टाटा यांच्या उत्तराधिकारी कोण?
रतन टाटा यांनी आपल्या कर्तृत्त्वाने टाटा समूहाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा रंगली होती. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी टाटा न्यासाची (टाटा ट्रस्ट) आज (11 ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत टाटा ट्रस्टच्या आगामी प्रमुखाच्या नियुक्तीवर चर्चा होऊ शकते. या ट्रस्टच्या प्रमुखपदासाठी रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांचे नाव सध्या समोर येत आहे.
आणखी वाचा