Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
Sanjay Raut in Mumbai: संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका.
मुंबई: एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडे गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवला, असे म्हणतात. पण एकनाथ शिंदे हे स्वत: पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या पायाशी गहाण आहेत. जो माणूस स्वत: मोदी-शाहांच्या पायाशी गहाण आहे, त्याने धनुष्यबाणाच्या गप्पा मारु नयेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मिळालेला धनुष्यबाण हा मोदींच्या कृपेने मिळाला आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊतांनी छगन भुजबळ यांनी दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा उल्लेख केला. अजित पवार गट आणि शिंदे गटाचे नेते ईडीपासून बचाव करण्यासाठी, आपली कातडी वाचवण्यासाठी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले. तसं नसतं तर भाजपमध्ये जातात प्रफुल पटेलांची ईस्टेट मोकळी झाली नसती. सध्या या सगळ्या नेत्यांच्या ईडी आणि सीबीआय फाईल्स कपाटात बंद करुन ठेवण्यात आल्या आहेत. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रताप सरनाईक हे नेते या भीतीमुळेच भाजपसोबत गेले. आता महायुतीचे सरकार जाणार असल्याने या नेत्यांना भीती नाही. या सगळ्या नेत्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये हवं ते साध्य केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आता या सगळ्या नेत्यांविरोधातील ईडीची कारवाई थांबली आहे. किरीट सोमय्या या नेत्यांविरोधात काहीही बोलत नाहीत. ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या प्रत्येक नेत्याला मोकळा श्वास घ्यायचा होता. म्हणून त्यांनी आपापल्या नेत्याच्या पोटात खंजीर खुपसला. माझ्यावरही दबाव होता. पण आम्ही मरण पत्कारु, पण शरण जाणार नाही, हे मी तेव्हाच स्पष्टपणे सांगितले. भाजपवाले खंजीर आणून देतात आणि तो कुठे मारायचा सांगतात. काही नेत्यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असतं. एरवी हे नेते डरकाळ्या फोडतात. पण आम्ही नंतर पाहिलं की या नेत्यांचं काळीज उंदरांचं होतं, असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
संजय राऊतांची योगी आदित्यनाथांवर टीका
यावेळी संजय राऊतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर टीका केली. मुंबईत 'बटेंगे तो कटेंगे'चे पोस्टर्स लागले होते. योगी आदित्यनाथ यांचे चार भाऊ आहेत. पण गेल्या 40 वर्षांमध्ये हे चार भाऊ एकत्र आले नाहीत. अनेक वर्षे योगी आदित्यनाथ आपल्या आईला भेटले नाहीत. ते वडिलांच्या अंत्ययात्रेला गेले नाहीत आणि योगी आम्हाला हिंदुत्त्व शिकवतात. भाजपने कायम 'बाटेंगे'चे राजकारण केले, आम्ही राष्ट्र आणि समाजा एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा