Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा होत आहेत. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत.
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सभा होत आहेत. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत. सांगलीमधील शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ शाह यांची सभा शिराळामध्ये आज (8 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता होणार आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघामध्ये अतुल भोसले यांच्यासाठी दुपारी एक वाजता सभा होणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची दुपारी तीन वाजता सांगलीमध्ये सभा होणार आहे.
कोल्हापूर दक्षिणमध्ये अमिता शाहांची सभा होणार नाही
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये भाजप उमेदवार राहुल आवाडे यांच्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता सभा होणार आहे. दरम्यान कोल्हापूर दक्षिणमध्ये सुद्धा अमित शाह यांची सभा होईल, अशी चर्चा रंगली होती. कोल्हापूर दक्षिणमध्ये सुद्धा भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सभा घेतली जाईल असं बोललं जात होतं. मात्र आजच्या नियोजनामध्ये कोल्हापूर दक्षिण मध्ये सभा होणार नाही. त्यामुळे कोल्हापुरातील फक्त राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची सभा होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये कोल्हापूरमध्ये अवघ्या दोन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. यामध्ये इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रमुख नेते तसेच इतर राज्यातील नेते महाराष्ट्रभर 170 हून अधिक निवडणूक रॅलींना संबोधित करतील अशी अपेक्षा आहे.
मोदींच्या 8 रॅली, गडकरींच्या 40, योगींच्या 15 रॅली
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण आठ दिवस महाराष्ट्रातील विविध भागात सभा घेणार आहेत. सीएम योगी 15 सभा घेणार आहेत. अमित शहा 20 तर गडकरी 40 जाहीर सभा घेणार आहेत. भाजप 288 जागांपैकी 148 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर त्यांनी मित्र पक्षांसाठी आपल्या कोट्यातून चार जागा सोडल्या आहेत
इतर महत्वाच्या बातम्या