Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत कथित दावे ?
Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत कथित दावे ?
द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महायुतीची कोंडी होण्याची शक्यता आहे. 'दैनिक लोकसत्ता'मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकातील मुलाखतीत छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…’ अशा नि:संदिग्धपणे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सूचित करतात. मी उच्च जातीचा असतो तर केंद्रीय यंत्रणांनी मला असे वागवले नसते: छगन भुजबळ ‘मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, असे छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी २ जुलै २०२३ या दिवशी अजितदादांनी शरद पवार यांचा हात सोडला आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदी प्रमुख नेत्यांसह ते भाजपच्या आश्रयास गेले. एकनाथ शिंदे यांनी जे शिवसेनेबाबत केले तेच अजितदादांनी राष्ट्रवादीशी केले. दोन्हींतही समान धागा भाजप हाच. तसेच यात आणखी एक साम्य आहे. एकनाथ शिंदे यांच्या अनेक साथीदारांप्रमाणे अजितदादांच्या अनेक साथीदारांवर विविध आरोप होते आणि काहींवर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या. खुद्द अजितदादा हेच ईडीच्या कचाट्यात होते. त्याच भीतीने या सर्वांनी पक्षत्याग करून भाजपशी घरोबा केला असे तेव्हाही बोलले जात होते. भुजबळ यांच्या या कबुलीने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.