Team India Returns Home | शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर ऑस्ट्रेलियातून परतलेल्या क्रिकेटपटूंना क्वॉरन्टीन नियमातून सूट
Team India Returns Home : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि एमसीएचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला क्वॉरन्टीनच्या नियमातून सूट मिळाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारताचा क्रिकेट संघ मायदेशी परतला. यावेळी मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंना क्वॉरन्टीनच्या नियमातून वगळण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि एमसीएचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला क्वॉरन्टीनच्या नियमातून सूट मिळाल्याचं समोर आलं आहे.
आज सकाळी साडे नऊच्या सुमारास टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर परतले. परंतु मुंबईत परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरन्टीनचे नियम शिथील करण्यात आले.
शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून मुंबईत परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
टीम इंडियाला नियमात सूट का? टीम इंडियाचे पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडूंना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. परंतु परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना क्वॉरन्टीन करावे लागले असते. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वॉरन्टीन न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एमसीएचे अध्यक्ष काय म्हणाले? खेळाडूंच्या आतापर्यंत अनेकदा कोविड टेस्ट झाल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांनी ब्रेक जर्नी करतानाही संपूर्ण नियमांचं पालन केलं आहे, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे. सोबतच प्रशासनाने उत्तम सहकार्य केल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबईत परदेशातून आलेल्या प्रवाशांना कोणते नियम? - कोरोनाव्हायरस आणि कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महिपालिकेने काही नियम लागू केले आहेत. - परदेशातून विशेषत: आखाती देश किंवा ब्रिटनमधून परतणाऱ्या प्रवाशांना सात ते चौदा दिवसांचा क्वॉरन्टीन पीरियड सक्तीचा आहे. - विमानतळावरच प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतर आरोग्य कर्मचारी बेस्ट बसद्वारे प्रवाशांना हॉटेलपर्यंत घेऊन जातात. - बीएमसीने ठरवलेल्या निवडक हॉटेलमध्ये प्रवाशांना क्वॉरन्टीन केलं जातं. या हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च प्रवाशांनाच करायचा आहे. - यानंतर क्वॉरन्टीन पीरियड पूर्ण झाल्यानंतर चाचणी करुन प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी मिळते.