Yavatmal News : खबरदार! बियाणांचा काळाबाजार केल्यास मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस आणि कृषी विभागाला आदेश
Yavatmal News : जादा दराने बियाणे विकणाऱ्यांवर अथवा बियाणांचा काळाबाजार करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई केली जाणार आहे. असा आदेश यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आणि कृषी विभागाला दिला आहे.
Yavatmal News यवतमाळ : साऱ्यांना आतुरता लागून राहिलेल्या मान्सून (Monsoon) हा राज्याच्या वेशीवर असून तो कुठल्याही क्षणी राज्यात सर्वत्र दाखल (Monsoon Arrived in Maharashtra) होऊ शकतो. त्या अनुषंगाने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची एकच लगबग सुरू असून पेरणीच्या तयारीला वेग आले आहेत. अशातच राज्यात बोगस बियाणांचा (Prohibited Seeds) सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. या बोगस बियाणांच्या विक्री प्रकरणी कृषी विभाग सतर्क झाले असून अशा बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून आहेत.
असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal News) छुप्या पद्धतीने प्रतिबंधित असलेल्या कपाशी बियाणांची विक्रीचा सिलसिला सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे. या प्रकरणी आता जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. जादा दराने बियाणे विकणाऱ्यांवर अथवा बियाणांचा काळाबाजार करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई केली जाणार आहे. असा आदेश यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आणि कृषी विभागाला दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस आणि कृषी विभागाला आदेश
खरिप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची शेतातील कामांना वेग आले आहे. अशातच बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रात जात असून बीजी 2 कपाशीचे तुलसी कंपनीचे कबड्डी, पंगा, अजित 155, अजित 05, ऍग्रिसिड 7076, राशी सिड्स 659, राशी सिड्स 779, स्विफ्ट, प्रवर्धन सीडलेस एएक्स, प्रवर्धन, रेवंत या सर्व बियाणांची 864 विक्री किमंत बाजारात असताना या बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहे. तसेच याचा फायदा घेत काही विक्रेते याची कृषी केंद्रतून 1100 ते 1350 या दराने एका पाकिटाची विक्री करीत आहे. या पूर्वीही असे काही प्रकार निदर्शनात आल्यानंतर या प्रकरणी आता जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.
हा गैरप्रकार टाळण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस तसेच कृषी विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा असून खरिप हंगामात शेतकऱ्यांना जादा दराने बि-बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आणि कृषी विभागाला दिले आहेत.
शेतकरी मशागतीनंतर लागवडीच्या प्रतीक्षेत
ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी आणि वादळी पावसाने अनेकदा हजेरी लावली. त्यामुळे जमीन ओलसर असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळवाईची मशागत करण्यास शेतकऱ्यांना सोपे गेले. मशागतीची कामे आटोपली असून काही भागात तर जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही केली. शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवड्याभरात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी लागवडीच्या कामाला लागणार आहे. यावर्षी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात 9 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार हेक्टरवर त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार तर तूर 1 लाख 15 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 2 लाख 54 हजार 450 मेट्रीक टन इतक्या विविध प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या