एक्स्प्लोर
राज ठाकरे भगव्या वाटेवर आहेत का? हिंदुत्वाच्या मुद्द्याचा मनसेला किती फायदा होईल?
मराठी भूमिपुत्रांच्या मुद्याचं राजकारण करणारी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) राज ठाकरे यांनी सुरू केली. कौटुंबिक सत्ता कलहाची पार्श्वभूमीही त्याला होती. मात्र, 2009 चा अपवाद वगळता मनसेला उतरतीच कळा लागली. आज हीच मनसे हिदुत्वाचा प्रयोग करु पाहतेय. यावर राजकीय विश्लेषकांना, इतर पक्षातील नेत्यांना काय वाटतं? यावर चर्चा करण्यासाठी आज एबीपी माझाच्या माझा विशेष या कार्यक्रमात मनसे, भाजप, काँग्रेसच्या प्रवक्त्यांसह राजकीय विश्लेषकांना बोलावण्यात आले होते.
मुंबई : राज ठाकरे आता मनसेला (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) नवं रुप देणार आहेत. उद्या (23 जानेवारी) पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात मनसेचं नवं रुप काय असेल ते कळेलच. परंतु त्याआधीच मनसेचा नवा झेंडा समोर आला आहे. मनसेचा नवा झेंडा पूर्णपणे भगवा झेंडा असेल. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. या राजमुद्रेला विरोध झाला तर त्यावर मनसेचं निवडणूक चिन्ह (रेल्वेचं इंजिन) असू शकतं. परंतु झेंड्याचा रंग मात्र पूर्णपणे भगवा असेल. यापूर्वी मनसेच्या झेंड्यात भगवा (मध्य भागी मोठ्या प्रमाणात ) निळा, हिरवा आणि पांढरा रंग होता. परंतु आता मनसे पूर्णपणे भगवी होणार, असे बोलले जाऊ लागले आहे. मराठीचा मुद्दा हा मनसे आणि राज ठाकरेंसाठी महत्त्वाचा होता. परंतु त्याला मुंबईत आणि महाराष्ट्रात आता मर्यादा येऊ लागल्या आहेत. म्हणून राज ठाकरे भगव्या वाटेवर जात आहेत का? असा सवालही उपस्थित होत आहे. राज ठाकरेंची पुढील दिशा काय असू शकते? भगव्या वाटेवर चालणाऱ्या मनसेला किती यश मिळेल? शिवसेनेला पर्याय ठरू पाहणाऱ्या मनसेला शिवसेनेची जागा घेता येईल का? अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी आज एबीपी माझाच्या माझा विशेष या कार्यक्रमात विशेष चर्चा आयोजित केली होती. महाराष्ट्र धर्म उलगडेल का यशाचं मर्म? असं आजच्या चर्चासत्राचं नाव होतं. या चर्चेत राजकीय विश्लेषक राजू परुळेकर, मनसेचे समर्थक प्रकाश महाजन (भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू), केशव उपाध्ये (भाजप प्रवक्ते), हेमलता पाटील (काँग्रेस प्रवक्त्या), मनसेचे नेते अभिजीत पानसे, भरतकुमार राऊत (ज्येष्ठ पत्रकार) या चर्चेत सहभागी झाले होते.
राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला राज्यातील जनता स्वीकारेल : प्रकाश महाजन
सत्व, स्वाभिमान, सत्य म्हणजे महाराष्ट्र धर्म. पंरतु या गोष्टी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाहीत. कोणीही कोणाशीही युती करतंय, चर्चा करतंय, यामुळे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा एक मोठा वर्ग सध्या सर्वच पक्षांवर नाराज आहेत. अशा परिस्थिती राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तर ती व्यापक भूमिका असेल, त्याला राज्यातील जनता पाठिंबा देईल.
आमचा महाराष्ट्र धर्म : अभिजीत पानसे
मनसेच्या जुन्या झेंड्यातही भगवा रंग अधिक प्रमाणात आहे, परंतु त्यामागे कोणताही धार्मिक अर्थ नव्हता. राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंट राज्यासमोर मांडली ही महाराष्ट्राविषयी होती. राज ठाकरे कायम महाराष्ट्राबद्दल बोलतात, मराठीबद्दल बोलतात, भूमिका घेतात, ते कधीही कोणत्याही जातीविषयी, धर्माविषयी बोलत नाहीत. मराठीचा मुद्दा हा आजही केंद्रस्थानी आहे. समजा उद्या पक्षाचा झेंडा बदलला गेला तर त्यामागे निवडणुकीचा हा विचार नाही. महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत त्यावर बोलणारं कोणी नाही. ते काम मनसे करेल.
राज ठाकरेंना सुरुवातीपासूनच भगव्याचं आकर्षन, परंतु ते आता हिंदुत्वाच्या वाटेवर जाणार नाहीत : राजु परुळेकर
चर्चेदरम्यान राजकीय विश्लेषक राजू परुळेकर म्हणाले की, भाजप सध्या देशाची एका फॅसिझमकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे भाजपला लोकांचा विरोध आहे. अशा परिस्थिती हिंदुत्वाकडे वळणं किंवा हिंदुत्वाचा पुरस्कार करणं ही मोठी जोखीम आहे, असं मला वाटतं. त्यामुळे राज ठाकरे त्या वाटेवर जाणार नाहीत. सर्वजण राज ठाकरेंच्या नव्या झेंड्याबद्दल बोलत आहेत, परंतु राज ठाकरेंना मी जेव्हापासून ओळखतो. तेव्हापासून मी पाहतोय की राज ठाकरे यांना भगव्याचं आकर्षण आहे. आज जर राज ठाकरे भगवा ध्वज पक्षाचा झेंडा म्हणून स्वीकारत असतील तर त्यावर भाजपचा प्रभाव आहे, असं बोलणं चुकीचं ठरेल.
Thane MNS | मनसेच्या पहिल्या अधिवेशनासाठी ओळखपत्रावरील रिबिनही भगवी, ठाण्यात मनसैनिकांकडून जय्यत तयारी
मनसेने राजकीय नितीचा फाटा बदलला आहे : भरतकुमार राऊत
मनसेकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. सुरुवातीला त्यांना खूप यश मिळालं. परंतु ते यश कायम राखता आलं नाही. परंतु आता मनसेने राजकीय नितीचा फाटा बदलला आहे. ते हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत, असं म्हणता येईल. त्यामागे तर्कशास्त्र आहे राजकारणात प्रत्येकजण योग्य संधीच्या शोधात असतो. काही कारणास्तव शिवसेनेला हिंदुत्व सोडावं लागलं आहे. ही बाब शिवसेना स्वीकारणार नाही. परंतु शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. मसने ती पोकळी भरून काढू पाहतेय, असं चित्र सध्या तरी दिसतंय.
मनसेच्या हिंदुत्वाबद्दल बारा बलुतेदारांना काय वाटतं? हिंदुत्वाची कास मनसेला भरारी देईल?
...तर राज ठाकरेंचं उद्याचं भाषण पाहण्याची गरज नाही : हेमलता पाटील
जर माध्यमं दाखवत असलेला झेंडा मनसेचा असेल, मनसेच्या झेंड्यावरील रंग गायब होणार असतील तर त्यावरुन सर्व चित्र स्पष्ट होतंय. झेंडे वगैरे या गोष्टी पक्षाची प्रतीकं असतात, त्यावरुन पक्षाची भूमिका, अजेंडे लक्षात येतात. भगवा झेंडा ते स्वीकारणार असतील, तर त्यांची भूमिका समजून येते. त्यामुळे राज ठाकरेंचं उद्याचं भाषण बघण्याची काहीही गरज नाही, असं मला वाटतं. त्यांचा झेंडा सर्व काही सांगून जातो.
राज ठाकरे हे अत्यंत मोठा लोकसंग्रह आणि लोकमान्यता असलेले नेते आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सॉफ्ट केली आहे, असं बोललं जातंय, त्यामुळे राज ठाकेरे त्यांची जागा घेऊ पाहत आहेत, असं बोलता येईल. भाजप हिंदुत्ववादी आहेच, परंतु राज ठाकरे विरोधी पक्षाची प्रादेशिक जागा घेऊ पाहात आहेत. राज ठाकरेंचे नेते शिवसेनेत फुट पाडू पाहत आहेत. राज ठाकरे हिंदुत्ववादाचा राजकारण करु पाहात आहेत, त्यांना असं वाटत असेल की, या नव्या अजेंड्यामुळे त्यांचं राज्याच्या राजकारणात बस्तान बसेल.
'राज'पुत्र अमित ठाकरेंचं राजकारणात लॉन्चिंग, पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
चर्चेचा सारांश
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा घेऊन पुढे हिंदुत्वाचं राजकारण केलं. मराठी हा श्वास तर हिंदुत्व हा आत्मा अशी ती मांडणी होती. मात्र, श्वासच उरला नाही तर आत्मा राहिल का? अशी भूमिका घेत मराठी भूमिपुत्रांच्या मुद्याचं राजकारण करणारी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) राज ठाकरे यांनी सुरू केली. कौटुंबिक सत्ता कलहाची पार्श्वभूमीही त्याला होती. मात्र, 2009 चा अपवाद वगळता मनसेला उतरतीच कळा लागली. नेमक्या अशाच स्थितीतून शिवसेनाही गेली होती. 90 च्या दशकाच्या आसपास शिवसेनेनं हिंदुत्वाची कास धरली आणि शिवसेनेचे आमदार-खासदार वाढू लागले. आज मनसे अशाच वळणावर आहे. यापूर्वी आझाद मैदान हिंसा प्रकरणी एकमेव राज ठाकरेंनीच मोर्चा काढला, तेव्हाच त्यांच्या वाटचालीची दिशा बदलू शकते हे कळू लागलं होतं. मनसेच्या जुन्या झेंड्यातील रंगामध्ये हिंदूंच्या भगव्या रंगाचा आकार मोठा होता. आता तर मनसेचा नवा झेंडाच पूर्ण भगव्या रंगाचा होतोय. महाराष्ट्रात शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या पक्षांसोबत गेली आहे. भाजपही सर्वसमावेशक होऊ पाहात आहे. कडवट हिंदुत्ववादी पक्ष सध्या महाराष्ट्रात नाही. अशावेळी मनसे ही पोकळी भरू शकते, असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. भाजपलाही शिवसेनेचा प्रभाव कमी करणारा नवा भिडू हवा आहेच. अर्थात, हिंदुत्ववादाची कास धरल्यास राज यांना राम मंदिर, सावरकर अशा प्रकरणात प्रखर भूमिका घ्यावी लागेल. ती तयारी त्यांची आहे का? की, झेंड्याचा रंग बदलला तरी जुनीच भूमिका कायम राहणार? भाजपबाबत राज मवाळ होणार का? हे आता उद्याच्या मनसे अधिवेशनातच कळणार आहे.
भगवी मनसे...राजकीय यश मिळवेल कसे? राज यांचा महाराष्ट्र धर्म उलगडेल यशाचं मर्म? माझा विशेष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement