लोकांची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही : शरद पवार
महाराष्ट्रातील जनतेने मला खूप दिलं आहे. अजूनही तुमची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे.

Sharad Pawar : "राज्याचा आणि तरूण पिढीचा विकास करायचा असेल तर सातत्याने पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील जनतेची साथ आणि शक्ती मला मिळाली आहे. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेत 52 वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं आहे. चार वेळा मला जनतेने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. जनतेने मला खूप दिलं आहे. अजूनही तुमची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उस्मानाबाद येथे व्यक्त केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या गटातील विविध विकास कामांचे उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. "उस्मानाबाद जिल्हा आणि राज्यातील जनतेने आपल्याला काही कमी केले नाही. त्यामुळेच आता उरलेलं आयुष्य राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार म्हणाले, "अनेक जण म्हणतात की मी 82 वर्षांचा झालो आहे. परंतु, मी अजून थकलेलो नाही, जोपर्यंत मला तुमची साथ आहे, तोपर्यंत राज्याच्या विकासासाठी मी काम करत राहणार आहे. उस्मानाबदचा पाणी प्रश्नही लवकरात लवकर सोडवला जाईल. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बोलणे झाले आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निविदा काढली असून पुढील काही महिन्यात काम सुरू होईल असे जयंत पाटील यांनी सांगितले असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
"उस्मानाबाद जिल्ह्याने मला खूप साथ दिली आहे. काही जण सोडून गेले आहेत. परंतु, जे गेले ते गेले, आपण काम करत राहायचे. जातीधर्माच्या पुढे जावून विकास केला पाहिजे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं आहे. सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन सामूहिक शक्ती उभा केली आणि शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभा केलं आहे. त्याचप्रमाणे विकास कामे करताना सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकास केला पाहिजे. मी राज्याच्या सर्वच भागात फिरत असतो. त्यामुळे राज्य, जिल्हा, तालुका असो की गाव, सर्वच काम माझ्यासाठी महत्वाचं असतं." असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar : 'माझ्यामुळे सुशीलकुमार शिंदेंनी राजीनामा दिला होता' ; शरद पवार यांनी सांगितली खास आठवण
- Sharad Pawar : आक्षेप नाही, मात्र अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येतायत : शरद पवार
- सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार: सुभाष देशमुख
- शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात अंतर नाही : सुशीलकुमार शिंदे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
