(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : 'माझ्यामुळे सुशीलकुमार शिंदेंनी राजीनामा दिला होता' ; शरद पवार यांनी सांगितली खास आठवण
'माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना आपल्यामुळे नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता, अशी एक आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितली आहे.
Sharad Pawar : "माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना राजकारणात येण्यासाठी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावले होते. त्यानंतर त्यांच्यासाठी विधानसभेचे तिकीट मागायला गेलो, परंतु, त्यावेळी त्यांना तिकीट मिळाले नाही. तिकीट कापल्यानंतर त्यांना भेटलो त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. माझ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता आणि तिकीट पण मिळालं नाही. त्यांच्यावर हे संकट माझ्यामुळे आलं होतं, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात शरद पवार बोलत होते. शरद पवार यांच्या हस्ते श्रीनिवास पाटील आणि मधुकर भावे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकारणातील प्रवेशावेळी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायला लावल्याची आठवण शरद पवार यांनी सांगितली. राजकारणात प्रवेश करण्यासाठी सुशील कुमार शिंदे यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी पुढे त्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तयार केले. परंतु, सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघातून सुशीलकुमार शिंदे यांना तिकीट मिळाले नव्हते. ही आठवण सांगताना शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेवर त्यावेळी आपल्यामुळे संकट आल्याचे सांगतले.
शरद पवार म्हणाले, माझ्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांना विधानसभेचे तिकीटही मिळाले नाही. या प्रकारानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो. परंतु, त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. या घटनेनंर मी गृहराज्यमंत्री झालो. त्यावेळी त्यांना माझ्याकडे वकिली करायला सांगितली. त्यांची वकिली जोरात चालली आणि नंतर त्यांना तिकीट मिळालं. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचले, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.
शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीही शरद पवार यांनीच आपल्याला राजकारणात पुढे आणल्याचे सांगितले. ते म्हणाले, शरद पवार यांच्यामध्ये आचार्य अत्रे यांच्यातील गुण आहेत. शिवाय कष्टाळू मुलांना पुढे घेऊन जाण्याची त्यांना सवय आहे. मला आणि श्रीनिवास पाटील यांना त्यांनी राजकारणात आणलं. परंतु, पुढं मी त्यांच्यासोबत राहिलो नाही ही खंत आहे. शरद पवार एक विचारवंत नेते आहेत. मी काटे नसलेलं गुलाब आहे, असं ते म्हणतात. परंतु, आपल्याकडील काटे दुसऱ्याला देऊ नये, हे शरद पवार यांनीच मला शिकवलं, अशी स्तुती सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या