कोरोनामुळे एका लग्नाच्या तीन तारखा; तिसऱ्यावेळी नववधु थेट दुचाकी चालवत नवरदेवाच्या दारात
यवतमाळमध्ये कोरोना व्हायरसमुळे दोनवेळा लग्नाची तारीख पुढे ढकलली. तिसऱ्यावेळी नववधु दुचाकी चालवत थेट नवरदेवाच्या दारात पोहचली.
यवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याचा फटका विवाह सोहळ्यांना बसत असून अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. संचारबंदीमुळे दोनवेळा लग्नाची मुहूर्त चुकल्याने आज लग्नाच्या तिसऱ्या वेळी नववधु थेट दुचाकी चालवत नवरदेवाच्या घरी पोहचली. आजच्या दिवशी वधूच्या आई वडिलांच्या अनुपस्थितीत हे लग्न पार पडले. या लग्नाला मोजकेच चारपाच लोक उपस्थित होते.
यवतमाळ शहरातील संकटमोचन परिसरात राहणाऱ्या सुकेशनी दडांजे या मुलीचा विवाह बाबुळगाव तालुक्यातील अंतरगाव येथील एका तरुणा सोबत नऊ मार्चला ठरला होता. मुला मुलीकडच्या मंडळींनी जोरदार तयारी केली. लग्नपत्रिका छापल्या मात्र दरम्यान कोरोनाचा विळखा वाढतात चालला असल्याचे लक्षात आल्याने अशा परिस्थितीत कोणाला कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी समंजस भूमिकेतून 9 मार्च या तारखेचा विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पुढे कोरोना संसर्ग कमी होईल, अशी आशा करून तो विवाह 31 मार्चला करण्याचे ठरवले. मात्र, दुसऱ्या वेळी सुध्दा नियोजित विवाह कोरोनामुळे झाला नाही.
घरबसल्या कोरोनाची लक्षणं ओळखा; विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल
आता कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागल्याने लग्नकार्य कसे करायचे? या विचारात दोन्हीकडील मंडळी पडली. आता वारंवार विवाह पुढे ढकलले योग्य नाही. त्यामुळे आता पाहुणे मंडळी जमली नाही तरी चालेल तीनचार लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचे ठरवले. त्यासाठी मुलीला सासरी घेऊन जाऊन पोहचविण्यासाठी मुलीकडच्या मंडळींनी प्रशासनाला कारची परवानगी मागितली. ती वेळेपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला. मुलीच्या घरच्यांनी मुलीला मेहंदी लावली होतीच. मग काय नववधूने दुचाकीने थेट तिचं सासर असलेले ( 20 किलोमीटर) बाभूळगाव तालुक्यातील अंतरगाव गाठलं. आज सकाळी या दोघांचा विवाह मोजक्या चार लोकांच्या उपस्थितीत पार पडला. नवरदेवाच्या घरीच अंतरपाट करून लग्न झाले. यावेळी मुलीचे आईवडील मुलीसोबत लग्नवेळी सुद्धा नव्हते. त्यामुळे कोरोना आणि संचारबंदीमुळे असा विवाह करण्याची वेळ या नवं दाम्पत्यावर आली.
EXPLAINER VIDEO | Nizamuddin Markaz | दिल्लीच्या मरकजमध्ये नेमकं काय घडलं? इथून कोरोनाचा प्रसार झाला का?