चोरी करताना सगळी काळजी घेतली, मात्र मोबाईलच्या वॉलपेपरमुळे चोर गजाआड
चोर सराईत किंवा हिस्ट्री शीटर नसल्याने त्याला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र पोलिसांनी एका स्क्रीन सेव्हरच्या आधारावर चोराला बेड्या ठोकल्या.
लातूर : चोराने चोरी करताना कितीही काळजी घेतली तरीही काहीतरी पुरावा पोलिसांच्या हाती लागतो आणि चोर गजाआड होतो. लातूरमधील एक चोरही असाच गजाआड गेला आहे. सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून या चोराने सगळी काळजी घेतली मात्र त्याची एक चूक पोलिसांना पुरेशी होती, त्याला पकडण्यासाठी. मोबाईलवरील स्क्रीन सेव्हरमुळे या चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पांडुरंग शिंगडे ह्या तरुणास ऑटो घेण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. यातून त्याला दुकान लुटण्याची कल्पना सुचली. त्याने एका मित्रास या चोरीसाठी तयार केले. त्यांनी लातूर शहरातील औसारोडवरील मधुबन सुपर मार्केटची रेकी केली. त्यानंतर रात्री सुपर मार्केटचा पत्रा वाकवून आता प्रवेश केला. बाहेर पाळतीवर मित्रास ठेवले. तोंडाला रुमाल बांधला. सीसीटीव्हीत दिसलो तरी ओळखू येणार नाहीत याची सर्व खबरदारी त्याने घेतली. मात्र गल्ल्यातील पैसे हातात पडल्यावर ते मोजण्यासाठी मोबाईल ओपन केला. त्या प्रकाशत त्याने नोटा मोजल्या 65 हजारांची लूट हातात होती. मात्र त्याची ही कृती सीसीटीव्हीत कैद झाली. त्याच्या मोबाईलचा स्क्रीन सेव्हर सीसीटीव्हीत कैद झाला. मात्र एका स्क्रीन सेव्हरवरुन चोराला पकडणे पोलिसांसमोर एक आव्हान होते.
चोर सराईत नव्हता त्यामुळे अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र गुन्हेगार सापडत नव्हता. पाच दिवसानंतर एक व्यक्ती दारू पिऊन गोंधळ घालत होती. रात्री गस्तीवरील पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांना शंका आली म्हणून त्याचे फोटो पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकत चौकशी केली. मात्र तो ऑटो चालक होता, म्हणून त्याचा संशय निवळला होता. पोलीस त्याला सोडणार होते त्याचवेळी त्याच्या मोबाईलवरील स्क्रीन सेव्हर पोलिसांच्या नजरेला पडले आणि चोराचा खेळ तिथेच संपला. त्यावरील महादेवाचा फोटो नजरेत भरणारा होता. त्यामुळे पोलिसी खाक्या दावखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याचा साथीदारही आता गजाआड आहे.