वेतनासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांसह 'आक्रोश', इंटक संघटनेसह भाजप आक्रमक
मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या परिवारानं (ST Worker Protest) राज्यभर आंदोलन पुकारलं आहे.प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नसल्यानं कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह 'आक्रोश' केला आहे.
मुंबई : एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं आहे. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही. त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब संवाद साधणार परिवहन मंत्री अनिल परब आज दुपारी 3 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून आंदोलनासंदर्भात आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात काही घोषणा केली जाईल का? याकडे लक्ष लागून आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकित पगाराबाबत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत आज निर्णय झाला नाही तर टोकाची भूमिका घेणार असल्याचा इशारा दरेकर यांनी दिला आहे.
एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक झाली आहे. 2 दिवसात कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर न भूतो न भविष्यती असं आंदोलन दिवाळी नंतर होणार असल्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. हे सरकार संवेदनशील नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. एसटी खाते मागील पंचवार्षिक पासून शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी खाजगीकरण केल्यानं एस टी वर ही वेळ आल्याचा गंभीर आरोप छाजेड यांनी केला आहे. आज एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कामगार उपायुक्त कार्यालयात झालेली बैठक निष्फळ झाल्याची माहिती आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार- रावसाहेब दानवे दिवाळीत बोनस तर सोडाच पण पगारही नाही ही गंभीर बाब आहे. केंद्राने जसं पॅकेज दिलं राज्याने तसं पॅकेज दिलं असते तर अशी वेळ आली नसती. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ एसटी कामगारांचं तीन महिन्यांचं थकीत वेतन मिळावं यासाठी जालन्यात कामगारांनी कुटुंबियांसमवेत घरासमोरच आक्रोश आंदोलन केलंय. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही. त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे. दरम्यान या दिवाळीपूर्वी शासनानं आम्हाला थकीत वेतन, महागाई भत्ता आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल देण्यात यावी अशी मागणी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे.
पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, संघटना आक्रमक
आमच्या वडिलांचा पगार करा, पुण्यात कर्मचाऱ्यांच्या मुलांची हाक ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यभरातील एस टी कामगारांचे थकीत पगार झालेले नाहीत. त्यामुळे पुण्याच आज एस टी कामगारांच्या कुटुंबियांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांची लहान मुले, कुटुंबातील सदस्यांनी आपल्या व्यथा सरकारसमोर मांडल्या. दिवाळीमध्ये घरी पैसेच नसल्याने फराळ, नवीन कपडे घेता येत नाहीत. त्यामुळे आमच्या वडिलांचा पगार करा ही विनंती आम्ही सरकारला करतोय अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी दिल्या.
चंद्रपुरात ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन चंद्रपूर : दिवाळी तोंडावर आली असतांना देखील ST कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. त्यातच या कर्मचाऱ्यांना आता अत्यावश्यक सेवेत सामील केल्यामुळे त्यांच्या आंदोलन करण्यावर देखील बंधनं आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून आपल्या घरासमोर बसूनच आंदोलनाला सुरुवात केली आहे.
मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव येथील वाहक मनोज चौधरी यांनी मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी जळगाव डेपो बंद ठेवत निषेध केला आहे. तर रत्नागिरी येथे पांडुरंग गदडे या एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.
जळगावच्या मनोज चौधरींची आत्महत्या, ठाकरे सरकारला धरलं जबाबदार कोरोनाच्या काळा पासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्रक एसटी प्रशासनाने जारी केलं आहे. दरम्यान, कामगार करार आणि वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ठोकणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला होता. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळावे, थकीत तीन महिन्याचे वेतन मिळावं यासाठी इंटक ने एसटी प्रशासना विरोधात कायदेशीर लढाई सुरू केलीय.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ कोरोनाच्या आपत्ती काळात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. यामध्ये एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून सुमारे 73 कर्मचारी मृत झालेले आहेत. कोरोना कालावधीमध्ये कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असताना, कामगारांना माहे ऑगस्ट 2020 पासून वेतन दिले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.