एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं उद्या राज्यभर आक्रोश आंदोलन
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचार्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर 2019 पासून वाढीव 5 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे.
धुळे : एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं उद्या राज्यभर आक्रोश आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्रक एसटी प्रशासनाने जारी केलं आहे. दरम्यान, कामगार करार आणि वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ठोकणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिलाय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळावे, थकीत तीन महिन्याचे वेतन मिळावं यासाठी इंटक ने एसटी प्रशासना विरोधात कायदेशीर लढाई सुरू केलीय.
कोरोनाच्या आपत्ती काळात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. यामध्ये एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून सुमारे 73 कर्मचारी मृत झालेले आहेत. कोरोना कालावधीमध्ये कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असताना, कामगारांना माहे ऑगस्ट 2020 पासून वेतन दिले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचार्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर 2019 पासून वाढीव 5 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एसटी कामगारांना सदरचा वाढीव 5 टक्के महागाई भत्ता अद्याप लागू केलेला नाही. त्याच प्रमाणे सन 2018 ची वाढीव 2 टक्केची 3 महिन्याची थकबाकी व सन 2019 ची वाढीव 3 टक्केची 9 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी ही एसटी कामगारांना अद्याप मिळालेली नाही. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना रुपये 12500 सण उचल लागू केलेले आहे. परंतु एसटी कामगारांना अद्यापपर्यंत रुपये 12500 सण उचल लागू केलेला नाही.
दिवाळीसारखा महत्त्वाचा सण 12 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. सदर सणापूर्वी एसटी कामगारांना मागील दोन महिन्याचे थकित वेतन, माहे ऑक्टोबरचे देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे. वास्तविक एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय तारखेस देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असतांनाही प्रशासनाकडून एसटी कामगारांना नियत देय तारखेस वेतन दिलेले नाही. कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे. दिवाळी सनापूर्वी दोन महिन्याचे थकीत वेतन तसेच ऑक्टोबरचे देय वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी, या मागणीसाठी संघटनेने सर्व स्तरावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व एसटी कामगारांना वेतन मिळावा या साठी दोन टप्प्यात आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या प्रथम टप्प्याला सर्व महाराष्ट्र खूप मोठा प्रतिसाद मिळाला असून त्या मार्फत प्रत्येक विभागात जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच विभागातील मान्यवरांना निवेदन देऊन एसटी कामगारांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्याची विनंती करण्यात आलीय. याच आंदोलनाचा दुसरा टप्पा सोमवार 9 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून एसटी कर्मचारी आपल्या राहत्या घरी आपल्या संपूर्ण कुटुंबियासह स्वगृही लाक्षणिक उपोषण करीत आपल्या व्यथा सरकार पुढे मांडणार आहेत. सोमवार 9 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडण्याचे आवाहन संघटना नेतृत्वाकडून करण्यात आलंय. तर दुसरीकडे असं कोणत्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नसल्याचं एसटी प्रशासनानं एका परिपत्रकाद्वारे नमूद केलंय. तसं झाल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं देखील एसटी प्रशासनानं या पत्रकात नमूद केलंय.