ग्रामस्थांच्या तावडीतून वाचण्यासाठी चोरट्याने विहिरीत उडी घेतली अन् जीव गेला! अक्कलकोटमधील घटना
Solapur Akkalkot News : ग्रामस्थांच्या तावडीतून वाचण्यासाठी पळालेल्या चोरट्याने विहिरीत उडी घेतली. यात चोरट्याचा बुडून मृत्यू झाला. सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे गावात ही घटना घटली
Solapur Crime Updates : सोलापुरातल्या अक्कलकोट (Solapur Akkalkot News) तालुक्यातील सुलेरजवळगे गावात धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामस्थांच्या तावडीतून वाचण्यासाठी पळालेल्या चोरट्याने विहिरीत उडी घेतली. यामध्ये चोरट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तब्बल 18 तास शोध घेतल्यानंतर या चोराचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे गावात चोरट्याने धुमाकूळ घातला होता.
सुलेरजवळगे गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांच्या घराचे दरवाजे तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कमेसह दागिने घेऊन बाहेर पडत असताना गावाकऱ्यांना याची कुणकुण लागली. गावातील काही तरुणांनी या चोरट्याचा पाठलाग सुरु केला. ग्रामस्थांच्या तावडीतून सुटण्यासाठी मिळेल त्या मार्गाने धावणाऱ्या चोरट्याने अखेर विहिरीत उडी घेतली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क केला. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काळे यांच्यासह पोलीस पथक गावात दाखल झाले. मात्र पाण्यात बुडाल्याने चोराचा विहिरीतच जीव गेला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मोहीम सुरु केली. जवळपास 18 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास चोराचा गावात धुमाकूळ
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोराने गावात धुमाकूळ घातला होता. या चोराने गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांची घराची दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कमासह दागिने घेऊन बाहेर चोर जात असताना गावातील युवक कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली. गावातील युवकांनी चोराचा पाठलाग सुरू केला. चोर गावकऱ्याच्यां तावडीतून सुटण्यासाठी वाटेल ते मार्ग निवडून तो पळू लागला होता. या पळापळीत चोरट्याने रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीतच उडी मारली. चोराने विहिरीत उडी घेतल्यानंतर गावातील युवकांनी ताबडतोब अक्कलकोट पोलिसांशी संपर्क साधला तोपर्यंत चोरट्याला विहिरीतच जीव गमवावा लागला.
18 तासाच्या शर्थीनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकडे उपनिरीक्षक प्रवीण लोकरे पोलीस नाईक मल्लिकार्जुन गोटे, पांढरे यांनी घटनास्थळी दाखल होत चोराला बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. 18 तासाच्या शर्थीनंतर पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. संशयीत चोरट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या