(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime : लातूर, बीड, नांदेडमध्ये चोऱ्या करायचे अन् विदर्भात आश्रयाला जायचे; टोळी जेरबंद, लातूर पोलिसांची मोठी कारवाई
लातूर पोलिसांनी सात जणांना जेरबंद करत जवळपास एक किलोच्या आसपास सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड केली आहे.
Latur Crime : लातूर पोलिसांच्या (Latur Police) वेगवेगळ्या पथकाने एकत्रित केलेल्या सर्च ऑपरेशनला यश आले आहे. सात अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले आहेत. सोबतच तब्बल एक किलो सोन्याचे दागिने चोरांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. लातूरच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी घरफोडी होत असते. बऱ्याचदा चोर सापडतात मात्र दागिने सापडतच नाही. दागिने सापडले तरी त्याचे प्रमाण खूप कमी असतं. मात्र लातूर पोलिसांनी सात जणांना जेरबंद करत जवळपास एक किलोच्या आसपास सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड केली आहे.
लातूर येथील रहिवासी आदित्य शिरीष बंडेवार यांच्या घरी जुलै महिन्यात चोरी झाली होती. 415 ग्राम सोने आणि पाच लाख रुपये चोरट्याने चोरले होते. याबाबत विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. चोरांची चोरी करण्याची पद्धत लक्षात घेता लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तात्काळ पोलिसांची चार पथक तयार केली. विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक पथक ,स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि इतर दोन पथक कामाला लागली.
याच दरम्यान पोलिसांना एक माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी लखन उर्फ अमरदीप जोगदंड राहणार अंबाजोगाई हल्ली मुक्काम पुणे, किशोर उर्फ पप्पू जोगदंड राहणार अंबेजोगाई हल्ली मुक्काम पुणे आणि प्रवीण उर्फ डोळ्या माने अंबेजोगाई यांना ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या साथीदारांची ही नावं सांगायला सुरुवात केली. यात सूर्यकांत मुळे अंबाजोगाई, अविनाश देवकर अंबाजोगाई, सुरेश ऊर्फ सुर्यकांत गंगणे अंबाजोगाई , सुदर्शन ऊर्जा सोन्याने परळी ही नावं समोर आली.
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि परळी भागातील हे सराईत गुन्हेगार
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि परळी भागातील हे सराईत गुन्हेगार आहेत. नॅशनल परमिट चार चाकी वाहन भाड्याने करून सावज हेरत मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात फिरत असत. दिवसभरात बंद असलेले घर हेरून रात्री घरफोडी करत असत. घरफोडी केल्यानंतर विदर्भातील यवतमाळ किंवा नागपूर सारख्या भागात ते निघून जात असत. यातील अनेक आरोपी हे पुण्याच्या विविध भागात वास्तव करून राहत होते. दोन ते तीन महिने सराईत पद्धतीने गुन्हेगारी करून विदर्भ मार्गे पुण्याकडे जाऊन पुढील काही महिने ते लपून बसत असत. मात्र यावेळी पोलिसाच्या पथकांनी त्यांना यवतमाळच्या भागातच ताब्यात घेतलं. यातील अनेक आरोपींवर वीस ते पंचवीस गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालं आहे
जिल्ह्यातील पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
या सात आरोपींकडून पोलिसांनी नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यात केलेल्या घरफोडीबाबत तपास केला. एकूण 13 ठिकाणी घरफोडी केल्याचं या चोरांनी कबूल केलं आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल 900 ग्रॅम सोन्याची दागिने अंदाजे किंमत 45 लाख रुपये, 500 ग्रॅम चांदी अंदाजे किंमत 33 हजार रुपये, रोख एक लाख वीस हजार रुपये, एक कार, असा एकूण 52 लाख रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.