Baramati Crime : "घाव मेरा घेहरा है अगला नंबर तेरा है" असं स्टेटस टाकलं अन् मुलीला शाळेतून आणायला गेलेल्या वडिलांची केली हत्या
Baramati Murder : आपल्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचा राग संबंधित अल्पवयीन मुलांच्या मनात होता, त्या रागातून त्यांनी या व्यक्तीची हत्या केली.
बारामती : शाळेत मुलीला आणायला गेलेल्या वडिलांचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली. बारामतीत 47 वर्षीय इसमचा निर्घृण खून करण्यात आला. बारामतीतील श्रीराम नगरमध्ये ही घटना घडली असून प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शशिकांत कारंडे असं मयत इसमाचं नाव आहे.
शशिकांत कारंडे हे त्यांच्या सातवीत शिकत असलेल्या मुलीला शाळेत आणण्यासाठी गेले असता आरोपी मुलांनी त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. यामध्ये जागीच शशिकांत कारंडे यांचा मृत्यू झाला. कवीवर्य मोरोपंत हायस्कूल शाळेच्या आवारात हा खून झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भर दिवसा हा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शशिकांत कारंडे हे फलटण तालुक्यातील मठाची वाडी गावचे रहिवासी आहेत. ते कामानिमित्त बारामतीत रहात होते. शशिकांत कारंडे यांच्या मुलावर मे महिन्यात प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर शशिकांत कारंडे यांनी हल्लेखोरांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यामध्ये तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मे महिन्यात शशिकांत कारंडे यांचा मुलगा एका मुलीशी बोलताना अज्ञात मुलांना दिसले. त्यांनंतर दोन अल्पवयीन मुलांनी कारंडे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला हॊता. त्यानंतर दोन अल्पवयीन मुलांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. बारामती शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलांना अटक करून कोर्टात हजर केलं होत.
त्याचाच राग मनात ठेऊन आज त्या अल्पवयीन मुलांनी शशिकांत कारंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डोक्यावर आणि मानेवर झालेल्या वारातून शशिकांत कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. शशिकांत कारंडे बारामतीतील भिगवण रोडवरील त्रिमूर्ती नगरमध्ये राहत होते. त्यांचा मृतदेह बारामतीतील सिव्हर ज्युबिली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. बारामती शहर पोलिसांनी पोलिसांची तीन पथक आरोपींच्या शोधासाठी पाठवली आहेत. बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. यावर बारामती पोलिसांनी वेळीच पावले उचलणे गरजेचं आहे.
'घाव मेरा घेहरा हे अगला नंबर तेरा'
घाव मेरा घेहरा हे अगला नंबर तेरा हे अस एका अल्पवयीन आरोपीचा स्टेट्स होता. त्या अल्पवयीन मुलाने कोयता हातात घेऊन फोटो काढला होता आणि त्याचा त्याने स्टेट्स होता. त्यामुळे हे स्टेटस इशारा तर नव्हता, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.