(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : फडणवीसांना फक्त सरकार पाडायची माहिती, शिंदेच मुख्यमंत्री होणार हे अमित शाहांनी महिना आधीच ठरवलं होतं; नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट
Nitin Deshmukh: ठाकरे सरकार पाडायचं यासाठी दीड-दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, गुवाहाटीला नंतर गेलेल्या जेष्ठ नेत्यांची टीम यामागची खरी सूत्रधार असल्याचं आमदार नितीन देशमुखांनी सांगितलं.
मुंबई: देवेंद्र फडणवीसांना फक्त उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडायची माहिती होती, पण शिंदेच मुख्यमंत्री होणार हे एक महिना आधीच ठरलं होतं असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. शिंदे मुख्यमंत्री होणार हे फक्त एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच माहिती होतं, एकनाथ शिंदे यांनी तसं सत्तांतराच्या महिनाभर आधीच सांगितलं होतं असंही ते म्हणाले. 'आवाज कुणाचा' या ठाकरे गटाच्या कार्यक्रमात आमदार नितीन देशमुख आणि आमदार कैलास पाटील यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
सत्तांतराच्या हालचाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच सहा सात महिन्यांनी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी आम्हाला त्याची कुणकुण लागली होती, पण गेले तर 20-22 आमदार फूटून जातील असं वाटत होतं. त्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही, सत्तांतर होणार नाही असं वाटत होतं असं नितीन देशमुख म्हणाले.
Nitin Deshmukh On Eknath Shinde : ज्येष्ठ नेते आधीपासूनच एकत्र, तेच सत्तांतराचे खरे सूत्रधार
शिंदे गटातील जे वरिष्ठ नेते आहेत ते सगळे आधीपासून एकत्र होते असं सांगत नितीन देशमुख म्हणाले की, गुलाबराव पाटील सांगतात आम्ही नंतर एकनाथ शिंदे सोबत गेलो. पण तसं नाही, हे सर्व सीनियर लीडर्स आधीपासून एकत्र होते आणि शेवटी ते एकनाथ शिंदेंकडे आले असं त्यांनी दाखवलं. ते आधीपासून सगळे सोबत होते. एकनाथ शिंदे सोबत नंतरची नेत्यांची टीम आली त्यातील ज्येष्ठ नेतेच या सगळ्या सत्तांतराची सूत्रधार होते.
सत्तांतर होण्याच्या एक महिने आधी आम्हाला माहीत होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. ते स्वतः मला ते म्हणाले होते मुख्यमंत्री मी असणार असा गौप्यस्फोट आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना फक्त सत्ता पाडायाची माहिती होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे फक्त शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माहीत होतं. आम्हाला प्रत्येकाला वेगळे वेगळे काहीतरी सांगितलं जात होतं.
Nitin Deshmukh Interview : दीड-दोन वर्षांपासून सरकार पाडण्यासाठी सापळा
कैलास पाटील आणि माझ्यात चर्चा झाली होती पण उद्धव ठाकरे यांना आम्ही कसं सांगायचं हे कळत नव्हतं असंही आमदार नितीन देशमुख म्हणाले. ते म्हणाले की, दीड दोन वर्षापासून या सगळ्याचा सापळा रचला जात होता. कधी वाटलं नाही एवढे आमदार त्यांच्यासोबत जातील. अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा हिंदुत्वाशी संबंध काय आणि हे म्हणतात बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. माझ्या जिल्ह्यात तर देवेंद्र फडणवीस कधी दिसले नाहीत. माझ्या जिल्ह्यात दंगल झाल्या, महिलांवर बलात्कार झाले तरी फडणवीस आले नाही. फक्त पक्षाची सभा घेण्यासाठी ते येतात.
महाविकास आघाडी स्थापन करताना 56 आमदारांचा तो निर्णय होता असं नितीन देशमुख म्हणाले. ते म्हणाले की, सकाळचा शपथविधी झाला, आमच्या आमदारांनी ते पाहिल्यांतर स्वतः उद्धव ठाकरेंना म्हणाले, काही करा पण महाविकास आघाडीसोबत आपली सत्ता आणा. मग त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, त्या गटातील काही सूत्रधार मागील अनेक महिन्यांपासून बोलत होते की आपण भाजपसोबत जाऊ, उद्धव ठाकरेंना आपण कन्व्हिनियन्स करू. त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी उद्धव ठाकरेंसोबत राहायचं. जे शिंदे 'मातोश्री'शी प्रामाणिक राहिले नाहीत त्यांच्यासोबत आम्ही गेल्यानंतर ते आमच्यासोबत काय प्रामाणिक राहणार?
आजारपणाचा काळ सोडला तर उद्धव ठाकरे यांना भेटायची अडचण कधीच आली नाही, सत्तांतर होताना चुकीचे कारणं सांगण्यात आल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला. उलट सरकारमध्ये असताना आमचे मंत्री आम्हाला भेटत नव्हते असंही ते म्हणाले.
Shivsena Kailash Patil Interview: ज्या दिवशी सुरतला निघाले त्या दिवशी नेमकं काय झालं?
विधानपरिषदेचे मतदान झालं, सगळी जबाबदारी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे होती. सगळं झाल्यानंतर आम्ही नंदनवन या त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यांनी सांगितलं तुम्ही पुढे चला आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. आम्ही त्यांच्या पीए सोबत सरकारी गाडीत ठाण्याच्या महापौर बंगल्यावर गेलो. तिथे आधी चार-पाच आमदार होते आणि तेव्हा मला शंका आली. तेव्हा मी त्या ठिकाणाहून उद्धव ठाकरेंना फोन लावला लोकेशन टाकलं आणि फोनवरून बोललो काही आमदार इथे आणले आहेत. आम्हाला नंतर सांगण्यात आले एकनाथ शिंदे तुम्हाला भेटणार आहेत आणि त्यानंतर आम्ही शहराच्या बाहेर पडायला लागलो. मात्र मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात त्यावेळी होतो.
गाडी कुठे थांबली जात नव्हती
आमदार कैलास पाटील पुढे म्हणाले की, तलासरीला जो चेक पोस्ट आला तिथे गाड्या थांबल्या. त्यांनी सांगितलं इथून आपल्याला चालत पुढे जायचं आहे. ती संधी मी साधली आणि त्यांच्यापासून दूर एक दीड किलोमीटर पुढे चालत आलो. उद्धव ठाकरे यांना फोन लावला आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका टू व्हीलर वर बसलो आणि पुढे पुढे येत राहिलो.