संजय राऊत म्हणाले, 'मला तर भीती वाटते, शिवसैनिकाची वडापावची गाडी असली तरी ईडी...'
Sanjay Raut on ED : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा ईडीवर हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut on ED : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा ईडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला तर भीती वाटते, आमच्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी कारवाई करेल. त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्र आणि बंगालमध्ये राज्यपाल फक्त राज्य सरकारांवर निशाने साधतात. इतरही राज्यात राज्यपाल आहेत, इतरही राज्यात ईडीचे कार्यालय आहेत. मात्र तिथे असं होत नाही. फक्त महाराष्ट्र बंगालमध्ये असं होतं याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, असं राऊत म्हणाले.
मूळ समस्या हिजाब नाही तर महागाई, बेरोजगारी
राऊत म्हणाले की, तेलाचे दर वाढत आहेत आणि काल अनेक दिवसानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तेलाच्या वाढत्या दराबद्दल वादंग झाला आहे, संसद चालू शकली नाही. आता निवडणूक संपली आहे. बीजेपीचा हा खेळ आहे लोक त्यात फसतात. मात्र लवकरच देशात महागाई विरोधात माहोल तयार होईल. मूळ समस्या रशिया किंवा युक्रेन नाही, हिजाब नाही तर महागाई बेरोजगारी ह्या मूळ समस्या आहेत, असं राऊत म्हणाले.
विदर्भातून मंत्रिमंडळात शिवसेनेला प्रतिनिधित्व?
राऊतांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतल्यापासून वर्षा बंगल्यावर अनेक वेळेला आमदाराला जेवणासाठी बोलावले आहे. ही परंपरा आहे, अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाला चहापानाला बोलवलं जातं तर अधिवेशनाच्या काळात महाविकास आघाडीच्या आमदारांना जेवायला बोलावलं जातं. विदर्भातून मंत्रिमंडळात शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळावा. यासाठी मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करताहेत. लवकरच मुख्यमंत्री त्यासंदर्भात निर्णय घेतील, असं राऊतांनी म्हटलं.
महाराष्ट्राच्या गृह विभागाला एक प्रतिष्ठा
राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा सूडाच्या भावनेने तपास आणि कारवाई करत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा गृह विभाग किंवा महाराष्ट्र सरकार कधीच करणार नाही. महाराष्ट्राच्या गृह विभागाला एक प्रतिष्ठा आहे.परंपरा आहे ते कायद्याचे पालन करूनच कारवाई करतील. विरोधी पक्षनेते कितीही बोलले की सुडाची कारवाई सुरू आहे, तरी आम्हाला सुडाची कारवाई करायची नाही. जर आम्हाला सुडाची कारवाई करायची असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल, असं ते म्हणाले.
राऊतांनी म्हटलं की, माझ्याकडे ज्या घोटाळ्याची माहिती होती. ते मी महाराष्ट्रात सरकार आणि तपास यंत्रणांना सोपवले आहे. आता पुढचं काम तपास यंत्रणांना करायचा आहे. त्यांना त्या पुराव्यांमध्ये काही दम वाटत असेल. तर ते कारवाई करतील. माझा काही त्यांच्यावर दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहे कारवाई करायला, असं राऊत म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha