सरसंघचालक मोहन भागवत यांचा शिवसेना-भाजपला अप्रत्यक्षपणे मोलाचा सल्ला
लोकांना जोडणं, त्यांच्याशी आत्मीयता ठेवणं हीच संघाची शिकवण आहे, असं सांगत एका प्रकारे सरसंघचालकांनी सत्तेसाठी भांडणाऱ्या भाजप-शिवसेनेचे कान टोचले.
नागपूर : गेले काही दिवस सतत भांडणाऱ्या आणि एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर जिव्हाळा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सरसंघचालक नागपुरात संघाचे दिवंगत स्वयंसेवक विलास फडणवीस यांच्या सहाव्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सरसंघचालक म्हणाले की, प्रत्येक वेळेला जिव्हाळ्याचा प्रतिसाद जिव्हाळ्यानेच मिळेल हे आवश्यक नाही. अनेकदा जिव्हाळ्याचा प्रतिसाद तिरस्कारानेही मिळू शकतो. मात्र तेव्हाही आपसातला जिव्हाळा आटू न देण्याची शक्ती माणसामध्ये असावी, असं सरसंघचालक म्हणाले. माणसांवर प्रेम करणे ही तपश्चर्या आहे, मात्र त्यासाठी खुप समजुतदारी लागते. एकमेकांना खुप समजून घ्यावं लागतं, असंही सरसंघचालक म्हणाले. संघाचा उत्तम स्वयंसेवक कोण असा प्रश्न विचारता, त्याचं उत्तर ही सरसंघचालकांनी खुबीने दिलं.
सरसंघचालक म्हणाले की, संघाचा तोच कार्यकर्ता उत्तम आहे, जो माणसाची कदर करतो. माणसांमध्ये राहून सतत माणसं जोडत जातो. संघ कशासाठी सुरु आहे, याची कारणमीमांसा ही सरसंघचालकांनी केली. संघ ध्येय निष्ठेसाठी आहे. मात्र संघाची ध्येयनिष्ठा आत्मीयतेशी जोडली आहे. संघाचा मूळ विचारच आत्मीयता आहे. लोकांना जोडणं, त्यांच्याशी आत्मीयता ठेवणं हीच संघाची शिकवण आहे, असं सांगत एका प्रकारे सरसंघचालकांनी सत्तेसाठी भांडणाऱ्या भाजप शिवसेनेचे कान टोचले.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. सध्याच्या राजकारणात प्रसिद्धीसाठी काम करणारे अनेक लोक आहेत. संघात नेहमीच माणसे आणि कार्यकर्ते जोडण्याची शिकवण दिली जाते, असं गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी यांनी गडकरी कुटुंबियांच्या पूर्ती सुपर बाजारचे एकत्रितरित्या काही मिनिटं अवलोकनही केले.