Parth Pawar : मावळ लोकसभेतून पार्थ पवार पुन्हा लढणार, ट्वीटद्वारे दिले संकेत?
महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपने शहरी आणि बाहेरच असा वाद निर्माण करून, लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावे असं आवाहन पार्थ पवारांनी (Parth Pawar) केलं आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar)मावळ लोकसभेतून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एका ट्वीटमधून त्यांनी स्वतःच तसे संकेत दिलेत. असं घडलं तर महाविकास आघाडीत वादाचे रंग पहायला मिळू शकतात. कारण सध्या इथं विद्यमान खासदार हे शिवसेनेचे श्रीरंग बारणे आहेत. मग अशावेळी शिवसेनेची भूमिका काय राहणार? की महाविकास आघाडीत या जागेवरून उभी फूट पडणार? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
पार्थ पवारांच्या ट्वीटमधला आशय हा पिंपरी चिंचवडमधील गाववाले आणि बाहेरच्या राजकारणाला अनुषंगाने आहे. हे राजकारण थांबवावं असं पार्थ पवार भाजपला उद्देशून म्हणत असले तरी यातून मावळ लोकसभेत पराभवाला कारणीभूत ठरलेल्या बाहेरच्या उमेदवाराचा मुद्दा देखील ते मांडू पाहतायेत. त्यामुळे हे ट्वीट म्हणजे 'एक तीर' दो शिकार' असाच काहीसा असल्याची चर्चा आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावलेत.विकासात कररूपाने सर्वांनीच समान वाटा दिलाय.त्यामुळे शहरी व बाहेरचा वाद उभा करून #सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावे.गाववाला व बाहेरचा हे राजकारण आता चालत नाही.आगामी निवडणुकीत लोक याला थारा देणार नाहीत #pcmc
— Parth Pawar (@parthajitpawar) November 22, 2021
पिंपरी चिंचवडमध्ये गाववाले आणि बाहेरचे अशी केवळ चर्चाच रंगत नाहीतर इथलं राजकारण देखील यावरच अवलंबून आहे. हे निवडणुकांच्या निकालावरून याआधी ही अनेकदा अधोरेखित झालंय. पार्थ पवारांना देखील याची अनुभती लोकसभा निवडणुकीत आलीच. मावळ लोकसभेतून शिवसेनेचे स्थानिक उमेदवार श्रीरंग बारणेंच्या पारड्यात मताधिक्य मिळालं, परिणामी बारामतीतून आलेल्या पार्थ पवारांना पराभव चाखावा लागला. कारण बारामतीचे पार्सल परत पाठवा हे निवडणुकीतील प्रचाराचा कळीचा एक मुद्दा होता. स्वतः हा अनुभव घेतलेल्या पार्थ पवारांनी त्याच अनुषंगाने एक ट्विट केलंय.
महापालिकेच्या सत्तेत असणाऱ्या भाजपला त्यांनी शहरी आणि बाहेरचा हा वाद निर्माण करून, लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावे. गाववाला आणि बाहेरचा हे राजकारण आता चालत नाही. आगामी निवडणुकीत लोक याला थारा देणार नाहीत. असं ट्वीट त्यांनी केलंय. भाजपला टार्गेट करतानाच पार्थ यांनी मावळ लोकसभेतील प्रचाराच्या मुद्द्यावर देखील यातून बोट ठेवलंय. शिवाय या ट्वीटमुळं पार्थ पवार मावळ लोकसभेतून पुन्हा नशीब आजमावणार असे संकेत मिळतायेत. हे संकेत महाविकास आघाडीच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकतात. कारण असं घडलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत मावळ लोकसभेच्या जागेवरून मोठं रणकंदण माजू शकतं. त्यामुळे पार्थ पवारांचे हे ट्वीट म्हणजे 'एक तीर, दो शिकार' असाच काहीसा असल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या :
- 'मला अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय', खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य
- 'अजित दादांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेत', संजय राऊतांचा सूचक इशारा
- किरीट सोमय्या म्हणतात, सर्वांना तुरुंगात टाकणं अशक्य; अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Maj