मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
माझं उपोषण सत्तेच्या विरोधात नसून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडं सत्ताधाऱ्यांचं लक्ष जावं म्हणून अससल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. तर, हे उपोषण म्हणजे नौटकी असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार जलील यांनी केला आहे.
औरंगाबाद - मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे यांचं उपोषण होणार आहे. या उपोषणासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. दरम्यान हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष जावं म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण असणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पंकजा मुंडे या उपोषणाला सुरुवात करतील. दिवसभर मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर लढा देणारे तज्ज्ञ मार्गदर्श करणार आहेत. दरम्यान, या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. उपोषणस्थळी मराठवाडा पाण्यापासून कसा वंचित राहिला आहे, याचं चित्रप्रदर्शन लावण्यात आलं आहे. वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिल्याचंही इथं नमूद करण्यात आलं आहे. दुपारी साडेतीन वाजता पंकजा मुंडे उपस्थितांना संबोधित करणार आहे.
हे उपोषण सत्तेच्या विरोधात नाही - पंकजा हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यांची सत्ता येऊन महिना झाला आहे, त्यामुळे त्यांनी लगेच हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा मी करत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांचं लक्ष या प्रश्नाकडं जावं म्हणून हे उपोषण असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही हा प्रश्न मी सातत्याने मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते हा प्रश्न सोडवतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हे उपोषण म्हणजे नाटक - खासदार जलील
हे पुढारी लोक नागरिकांना मूर्खात काढत आहे, ज्यावेळी भाजपचं राज्यात आणि केंद्रात सरकार होतं त्यावेळी यांनी काय केलं? सरकार गेल्यामुळेच ही नौटकी सुरू केल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. मागील पाच वर्ष तुमचीच सत्ता होती, तुम्ही मंत्रीही होता. त्यामुळे लोक तुमच्या नौटकीला ओळखतील, अशी टीकाही जलील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे. राज्यात महाआघाडीचं सरकार जाईल आणि आम्हाला संधी मिळेल, त्यावेळी सत्ता नसतानाही आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी कसं रस्त्यावर उतरलो होतो, हे सांगण्यासाठीच भाजपचं हे नाटकं असल्याचं खासदार जलील म्हणाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार देखील नाटक असल्याचा आरोप जलील यांनी केलाय.
Pankaja Munde | उपोषण सत्तेच्या विरोधात नाही, हे अपेक्षांचं उपोषण : पंकजा मुंडे | ABP MAJHA