पालघर हत्याकांड प्रकरण : सीआयडीकडून चौकशी करण्यात आलेल्या 32 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या
पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणाचा जबाब नोंदवण्यात आला होता. मात्र सहभाग नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी करून सोडण्यात आलं होतं. परंतु, पोलिसांच्या भीतीनेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
पालघर : गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात सीआयडीकडून चौकशी करण्यात आलेल्या 32 वर्षीय तरुणाने जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विणश धर्मा धांगडा असं या 32 वर्षीय तरुणाचं नाव असून आरोपी नसताना देखील पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप विणशच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
16 एप्रिलला पालघर मधील गडचिंचले येथे दोन साधूंची आणि त्यांच्या चालकाची चोर समजून जमावाकडून निघृन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सदर तपास आता सीआयडीकडे असून अनेकांचे जबाब घेण्याचं काम सुरु आहे. सदर प्रकरणात 11 मे रोजी चिंचपाडा येथील विणशचा जबाब घेण्यात आला होता. मात्र विणशचा या प्रकरणात सहभाग नसल्याचं लक्षात आल्याने त्याची चौकशी करून सोडण्यात आलं होतं. तरिही भीतीपोटी विणश मागील अनेक दिवसांपासून जंगलात जाऊन रहायचा. 5 जूनला विनय जंगलात गेला तो पुन्हा घरी आलाच नाही. त्यानंतर घरच्यांनी शोध घेतल्यानंतर विणशचा मृतदेह जंगलातील एका झाडाला लटकलेला आढळून आला. पोलिसांच्या भीतीने विणशने आत्महत्या केल्याचा आरोप विणशच्या कुटुंबीयांनी केला आहे.
निरक्षर असलेल्या विणशचं 12 वर्षांपूर्वी गावातील रशीदा नावाच्या मुलीसोबत लग्न झालं असून त्याला 4 मुलं आहेत. या चारही चिमुकल्याच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलं आहे. अत्यंत हलकीच्या परिस्थिती असल्याने या मुलांचं संगोपन करायचं कसं असा प्रश्न सध्या त्यांच्या आई समोर उभा राहिला आहे. आरोपी भेटले नाही तर गावातील सर्वांना अटक करू असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत असल्याने विणशने हे पाऊल उचललं असल्याचं त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात येतं आहे.
पाहा व्हिडीओ : पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे, घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद
साधूंसह तिघांची हत्या
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं होतं. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आलं होतं. पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमे लावण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या :
पालघर जमाव हत्याकांड : 101 आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी
पालघर झुंडबळी प्रकरणी राज्य सरकारकडून सीलबंद अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर
पालघर प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस