मी आरोपी असल्यासारखे प्रश्न विचारले गेले; कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर राज्य सरकारवर आरोपांचे बाण सोडले.
Devendra Fadnavis : गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले असल्याचे दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई पोलिसांनी दोन तास चौकशी केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला. यापुढेही राज्य सरकारचे काळे कारनामे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी म्हटले. सभागृहात उपस्थित करत असलेल्या प्रश्नामुळे ही चौकशी दबावासाठी करण्यात आली असल्याचाही आरोप त्यांनी केला.
राज्यातील बदल्यांच्या महाघोटाळ्याची माहिती केंद्रीय गृह सचिवांना दिली. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याआधी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता. राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली नव्हती असेही फडणवीस यांनी म्हटले. वेळेत राज्य सरकारने याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसतं असेही फडणवीस यांनी म्हटले.
याआधी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. मात्र, ती प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मोठा फरक होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. या प्रकरणात मला आरोपी अथवा सह आरोपी करता येईल का असा पोलिसांच्या प्रश्नाचा रोख होता. मी गोपनीय कायद्याचा भंग केला असा रोख पोलिसांचा होता. माझ्या आरोपानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्यावर व्हिसलबोअर कायदा लागू झाला पाहिजे असे फडणवीस यांनी म्हटले.
सभागृहातील विषयांमुळे नोटीस
मी सभागृहात सरकारविरोधातील मुद्दे मांडत असल्यामुळे मला अचानक नोटीस पाठवण्यात आली असावी. सरकारकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या या दबावासमोर झुकणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. दाऊदशी संबंधित असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा आणि इतर मुद्यांवर कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
मलिक यांच्यावर कारवाई करा
पोलीस बदली घोटाळा प्रकरणी मी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मात्र, ट्रान्सस्क्रिप्ट आणि इतर माहिती पत्रकारांनी दिली नाही. ही माहिती अतिशय संवेदनशील असल्याने ही माहिती दिली नाही. या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश असल्याने केंद्रीय गृहसचिवांना ही माहिती, यादी दिली. या उलट राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना ही माहिती देत नावे उघड केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Aaditya Thackeray : देवेंद्र फडणवीस यांची पोलीस चौकशी, आदित्य ठाकरे यांनी म्हटले...
- Nitesh Rane: महाराष्ट्रात नोटीस मिळणं म्हणजे गुड मॉर्निंग मेसेजसारखं, नितेश राणेंचं वक्तव्य