एक्स्प्लोर
तानाजी सावंतांच्या घराबाहेर खेकडे सोडून राष्ट्रवादीचं आंदोलन
तिवरे धरण फोडल्यानंतर हे खेकडे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचं घरही फोडू लागले आहेत. त्यामुळे तातडीने या खेकड्यांवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी उपरोधिक तक्रार राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.

पुणे : खेकड्यांनी पोखरल्यामुळे तिवरे धरण फुटल्याचा दावा केल्यानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत टीकेचा विषय ठरले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सावंतांच्या घराबाहेर खेकडे सोडून अनोखं आंदोलन केलं.
'तानाजी सावंत यांच्या घरी खेकड्यांनी धुमाकूळ घातला आणि त्यांचं निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाली. आम्ही सर्वांनी जलसंधारण मंत्र्यांच्या घरी धाव घेतली. या खेकड्यांना पकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षकांच्या ताब्यात दिलं' असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
तिवरे धरण फोडल्यानंतर हे खेकडे मंत्र्यांचं घरही फोडू लागले आहेत. त्यामुळे तातडीने या खेकड्यांवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अन्यथा उद्या अजून काही दुर्घटना घडू शकतील, अशी उपरोधिक तक्रार राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.
खेकड्याची थिअरी कुठून आली?
खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला होता. तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
पुण्यात मुठा नदीच्या कालव्याची भिंत फुटून झालेल्या अपघाताचं खापरही त्यावेळी उंदीर आणि खेकड्यांवरच फोडण्यात आलं होतं. त्या प्रकाराची पुनरावृत्ती यावेळी होताना दिसत आहे.
खेकड्याने भिंत पोखरल्याची थेअरी शिवसेना आमदाराला वाचवण्यासाठी नाही, मला जे ग्रामस्थांनी सांगितलं, तेच मी सांगत असल्याची पुस्तीही तानाजी सावंत यांनी जोडली होती. 'माझं आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी बोललो आहे. त्यांचं म्हणणं आहे अचानक पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे हे झालं. 2004 ला हॅन्डओव्हर झाल्याने चव्हाणांचा यात संबंध नाही' असं म्हणत सावंतांनी त्यांची पाठराखण केली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
मुंबई
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















