एक्स्प्लोर
पोलिसांच्या ढिलाईमुळे बलात्कार पीडितेचा आरोपीकडून छळ

नागपूर : बलात्कार प्रकरणातील दोषींच्या मुसक्या आवळण्याची भाषा करणाऱ्यांच्याच संवेदनशीलतेचा बुरखा फाटल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावातच एका बलात्कार पीडितेला पोलिसांच्या असहकार्याचा कटु अनुभव येत आहे. पोलिसांच्या ढिलाईमुळे आरोपीकडून सतत पीडित तरुणीला छळलं जात आहे. त्यामुळे न्याय मागून चूक केली का? असाच सवाल पीडित तरुणी निगरगट्ट व्यवस्थेला विचारते आहे. 25 मे 2016 रोजी नागपुरातील एका तरुणीवर तिच्याच मित्रानं बलात्कार केला. मोठ्या हिंमतीनं ती गिट्टीखदान पोलिस ठाण्यातही पोहचली. पण, बलात्कारी पराग हा निवृत्त पोलिसाचा मुलगा असल्यानं गुन्हा नोंदवण्यासाठीही तिला बरंच लढावं लागलं. गुन्हा दाखल झाल्यानंतरही या बलात्कार पीडितेचा संघर्ष संपण्याचं नाव घेत नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून पीडित तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. रात्री बेरात्री तिच्या घराभोवती आरोपीचे मित्र चकरा मारतात. याविषयी पोलिसांना सांगूनही या टवाळांना वचक बसत नसल्यानं आता त्यांची मजल पीडित तरुणीला अश्लिल फोन कॉल करण्यापर्यंत गेली आहे. इतकंच नाही, तर पीडितेच्या धाकट्या भावालाही आरोपीच्या मित्रांकडून भीती दाखवली जात असल्याचं तिचं म्हणणं आहे. हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे, पण सोनेगाव पोलिसांनी मात्र याबाबतची तक्रार अदखलपात्र करत थेट कोर्टात जाण्याचा सल्ला दिल्याचं या तरुणी सांगते. याबाबत नागपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत, हे विशेष.. बलात्काराच्या घटनेनंतर पीडित तरुणीबद्दल सगळेच सहानुभुती दाखवतात. पण, ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा असते, त्यांच्याकडून मदत मिळतच नाही. त्यामुळे बलात्कार पीडितेनं न्यायाची अपेक्षा ठेवायची की नाही? याचं उत्तर संवेदनशील राज्यकर्त्यांनी दिलंच पाहिजे.
आणखी वाचा























