Maratha Reservation | राज्यभरात मराठा संघटनांचं आरक्षणासाठी आंदोलन; मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलकांचा ठिय्या
राज्यभरात मराठा संघटनांनी आरक्षणासाठी आज आंदोलन केलं. मराठवाड्यात काही ठिकाणी ध्वजारोहणासाठी आलेल्या मंत्र्यांना घेराव तर काही मंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हंगामी स्थगिती दिल्यामुळे सरकारचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजातर्फे आज राज्यातल्या विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठवाड्यात काही ठिकाणी ध्वजारोहणासाठी आलेल्या मंत्र्यांना घेराव तर काही मंत्र्यांच्या घराबाहेर धरणं आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.
मराठा समाजामध्ये अस्वस्थतेची भावना आहे. त्यामुळे आरक्षण टिकून रहावे यासाठी सरकारने, लोकप्रतिनिधीनी ठोस पावले उचलावी या कारणासाठी पुण्यात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना दहा मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. आज या आंदोलनात काही मुस्लीम संघटनांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला आणि या आंदोलनात देखील सहभागी झाले.
कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आज पुन्हा एकदा आंदोलन केले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. आज कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी पुणे आणि मुंबईला जाणारे दुधाचे टँकर अडवले. यावेळी सरकार आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती तत्काळ थांबवावी, अशा पद्धतीची मागणीदेखील यावेळी आंदोलकांनी केली. जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढच्या दोन दिवसात याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेडमध्ये मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर छावा संघटनेनं ढोल बजाओ आंदोलन केलं. अशोक चव्हाणांनी भेट घेतल्यानंतर साडेचार तासानंतर आंदोलन संपलं. आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. आरक्षणावर ठोस निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
लातूर जिल्ह्यातील बाभळगावमध्ये पालकमंत्री अमित देशमुख यांच्याही घराबाहेर आंदोलन झालं. अमित देशमुखांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. अमित देशमुखांनी मराठा क्रांती मोर्चातील आंदोलनकांशी संवाद साधला संवाद. अमित देशमुखांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारलं. त्यानंतर साडेतीन तासांनी आंदोलन संपलं.
जालन्यात मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमानंतर गाडीत बसताना आंदोलकांची घोषणाबाजी केली. पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय. औरंगाबागेद मराठा मोर्चातील आंदोलकांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलन केलं. मराठा मोर्चा कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलं. नेत्यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी केली.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी बीड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झालं. हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन करुन परतणारे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्या धनंजय मुंडे यांच्यासमोर वाचून दाखवल्या.
महत्वाच्या बातम्या :- पोलीस भरतीत मराठा समाजाला राज्य सरकार न्याय देणार : गृहमंत्री अनिल देशमुख
- पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजेंचा संताप
- मराठा आरक्षणाला स्थगिती धक्कादायक, मात्र केंद्राकडे बोट दाखवणं चूक : देवेंद्र फडणवीस
- सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे