(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजेंचा संताप
12 हजार 528 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?" असा सवाल त्यांनी विचारला.भाजप आमदार नितेश राणे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनीही पोलीस भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
मुंबई : राज्यात पोलीस शिपाई पदासाठी मोठी भरती होणार आहे. तब्बल 12 हजार 528 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?" असा सवाल विचारत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलीस भरती घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच भाजप आमदार नितेश राणे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनीही पोलीस भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
पोलीस भरती घेणं म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं : संभाजीराजे हा निर्णय ऐकून मी दु:खी झालो. सध्या पोलीस भरती करण्याचं वातावरण नाही. ५८ मोर्चे निघाले बहुजन समाने सपोर्ट केल्यानेच ते यशस्वी झाले. आज मराठा समाज दुखी आहे. आपल्याला आरक्षण पुन्हा कसं मिळणार याकडे लक्ष केंद्रीत करायला हवं. नोकरभरती पुढच्या टप्प्यात करा ना, आजच का घ्यायचीय? तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायचीय का? मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती करु नका. बाकीच्या समाजाचे लोक समजून घेतील. समाजातील लोकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आता पोलीस भरती घेणं म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं आहे.
राज्यात 12 हजार 894 पोलिस शिपयांची भरती, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
सरकारने जखमेवर मीठ चोळलं : मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारने पोलीस भरती जाहीर करुन मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. भरती त्वरित थांबवावी अन्यथा राज्यभर आंदोलनं होतील, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. तसंच लोकशाही मार्गाने आंदोलनं करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांचा दबाव टाकून, गुन्हे दाखल करुन मराठा समाजाला पेटवण्याचे काम सरकार करत आहे का? असा सवालही त्यांनी विचारला
पोलीस भरती करुन आगीत तेल टाकण्याचं काम : नितेश राणे भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही या पोलीस भरतीवर प्रश्न उपस्थित करुन सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती करुन सरकार आगीत तेल टाकत असल्याचं ते म्हणाले. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती...मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर? जोपर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती कशाला? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का?"
राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती.. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात.. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??
— nitesh rane (@NiteshNRane) September 17, 2020
राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (16 सप्टेंबर) पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे. पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला आदेश दिले आहेत.