(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena : ठाणे, नवी मुंबईनंतर शिवसेनेला तिसरा धक्का; कडोंमपामधील 45 नगरसेवक शिंदे गटात
Maharashtra Politics Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. कल्याण डोंबिवलीतील 45 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
Maharashtra Politics Shivsena Eknath Shinde : ठाणे, नवी मु्ंबईनंतर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कल्याण-डोबिंवलीमधील 45 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. या नगरसेवकांसोबत काही स्थानिक पदाधिकारीदेखील सामिल झाले आहेत. शिवसेनेकडे कल्याण-डोबिंवली महापालिकेत मागाील काही वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे.
शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडाचे लोण आता अपेक्षेप्रमाणे स्थानिक पातळीवर पोहचू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिकेतही शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचे 67 पैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर, नवी मुंबई महानगरपालिकेतील 30 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. यामध्ये नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचाही समावेश आहे. त्याशिवाय, किशोर पाटकर, शिवराम पाटील, नविन गवते , सुरेश कुलकर्णी आदींचाही समावेश आहे.
ठाण्यानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेतील बहुतांशी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरल्याने स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवलीतील माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे म्हटले.
माजी महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक , महेश गायकवाड ,माधुरी काळे,रवी पाटील ,डोंबिवली शहरप्रमुख व माजी नगरसेवक राजेश मोरे, उपजिल्हा पमुख राजेश कदम, प्रमोद पिंगळे, विश्वनाथ राणे यांच्यासह नुकत्याच इतर पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक महेश पाटील,नितीन पाटील ,रणजित जोशी, विशाल पावशे आदीसह 45 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे 56 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी इतर पक्षातील नगरसेवकांचा पक्ष प्रवेश एकनाथ शिंदे यांनी घडवून आणला होता. त्यामुळे नगरसेवकांची संख्या 68 पर्यंत पोहचली होती.
मुंबई महापालिकेसह ठाणे, कल्याण-डोबिंवली महापालिकेवर शिवसेनेचे काही दशकांपासून वर्चस्व आहे. त्यापैकी ठाणे, कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. तर, मुंबईतील यशवंत जाधव आणि समाधान सरवणकर हे दोन नगरसेवक उघडपणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मुंबईतील नेमके किती नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची मोठी कसोटी लागणार आहे.