(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics Shivsena : गाफील राहू नका, नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
Maharashtra Politics Shivsena : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता निवडणूक चिन्हं वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे नवीन निवडणूक चिन्ह मिळाल्यास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Politics Shivsena : शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या कारवाईला शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टात येत्या 11 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याशिवाय, शिंदे गटाने शिवसेनेने विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीलाही आव्हान दिले आहे. यासह इतर याचिकांवरही सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याआधीच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर भाजपने नवीन विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा शह मिळाला आहे.
विधीमंडळात या घडामोडी सुरू असताना बंडखोर गटाने आमचाच शिवसेना पक्ष खरा असल्याचे सांगत निवडणूक चिन्हावरही दावा करण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे गटात ठाणे, नवी मुंबईतील बहुतांशी नगरसेवक सामिल झाले आहेत. तर, काही माजी लोकप्रतिनिधीदेखील शिंदे यांच्या गटाच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर विधीमंडळातील लढाईसोबत शिवसेनेकडून कायदेशीर लढाई केली जात आहे. मुंबई, दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, वकीलांसोबत शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये कायदेशीर डावपेचाची आखणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास काय करता येईल, याचीही तयारी शिवसेनेने केली आहे. निवडणूक चिन्ह चिन्ह गोठवल्यास शिवसेनेला आगामी मुंबईसह राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे. शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐनवेळी आलेले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत घेऊन जाण्याची तयारी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटले की, सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी सुनावणी आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल गेल्यास त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना विधीमंडळ पक्ष होईल. त्यानंतर पक्षात उभी फूट निश्चित समजली जाईल. शिंदे यांच्याकडे काही खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरा पक्ष आमचा असल्याचा दावा होण्याची शक्यता आहे. अशा वेळी निवडणूक आयोग पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवते. मात्र, अद्याप तिथपर्यंत हा संघर्ष पोहचला नाही. मात्र, संभाव्य तयारी उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेनेच्या दृष्टीने 11 जुलै रोजीची सुनावणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.