Pandharpur News: भगीरथ भालके आज हजारो समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार, राष्ट्रवादीकडून तातडीची डॅमेज कंट्रोल बैठक
भालके याना मानणारा फार मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असल्याने त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भालके समर्थक करत आहेत .

पंढरपूर: राष्ट्रवादीला (NCP) धक्का देत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे आज राष्ट्रवादीला रामराम ठोकत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे हडबडलेल्या राष्ट्रवादीने पक्षातून कोणीही जाणार नसल्याचे सांगत भालके यांचे डिपॉजिट जप्त होईल असा दावा केला आहे . बीआरएस चे सर्व आमदार , खासदार आणि मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत . यानंतर ते भालके यांच्या सरकोली येथील गावी सर्व ताफ्यासह जाणार असून त्यांच्या चार तासाच्या दौऱ्यातील तीन तास त्यांनी भालके यांच्यासाठी दिला आहे .
खास महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत
भालके याना मानणारा फार मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असल्याने त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भालके समर्थक करत आहेत . के चंद्रशेखर राव उद्या सकाळी साडे दहा वाजता भालके यांच्या सरकोलीत पोचणार असून सुरुवातीला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी भालके यांनी आपल्या शेतात भला मोठा मंडप उभारला असून गाड्या पार्किंगसाठी दोन एकरावरील डाळिंबाची बाग मोकळी केली आहे. तेलंगणाच्या सर्व पाहुण्यांना भालके यांच्याकडून खास महाराष्ट्रीय बेत जेवणासाठी तयार केला असल्याने केसीआर हे भालके यांच्या निवासस्थानी भोजन करून दुपारी दीड वाजता तुळजापूर कडे प्रयाण करणार आहेत .
राष्ट्रवादीचे धाबे दणाणले
भालके यांच्या बीआरएस प्रवेशाच्या निर्णयाने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले असून काल जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे, राज्य प्रवक्ते उमेश पाटील, अभिजित पाटील, कल्याणराव काळे, गणेश पाटील अशा दिग्गजांच्या उपस्थितीत डॅमेज कंट्रोलची बैठक घेण्यात आली. यानंतर बोलताना उमेश पाटील यांनी भालके यांच्यावर निशाणा साधताना भगीरथ हे वडील आमदार असताना त्यांच्याच गावातून जिल्हा परिषदेला पराभूत झालेले आहेत . त्यांना पोटनिवडणुकीत पडलेली एक लाख पाच हजार मते राष्ट्रवादीची असल्याने ही मते आपल्या मागे असल्याचा भ्रम भालके यांनी करू नये असा टोला लगावला. भालके यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही पदाधिकारी अथवा नेता बीआरएस मध्ये जाणार नसून सर्व पदाधिकारी , नेते बैठकीत हजर असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला . येत्या विधानसभेला भगीरथ भालके यांचे डिपॉजिट देखील राहणार नसल्याचा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला आहे .
पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठकांचा सपाटा
दरम्यान या साठमारीत भगीरथ भालके यांनी गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठकांचा सपाटा लावत सर्वांना सोबत घेऊन जायची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते आज भालके यांच्या सरकोली गावात पोचले होते . अभिजित पाटील यांना शरद पवार यांनी प्रवेश दिल्यानंतर राष्ट्रवादीला फुटीची घरघर लागली असून भगीरथ भालके यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो आहे .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
