Aurangabad: 'लव्ह जिहाद'चे पडसाद औरंगाबादेतही, राजकारण पेटले; प्रकरण पोलिसात
Aurangabad : भाजपच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात केली आहे.
Love Jihad: राज्यातल्या अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये देखील 'लव्ह जिहाद'चे पडसाद पाहायला मिळत असून, एका तरुणावर प्रेयसीकडून धर्मांतरासाठी दबाव आणला गेल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तर याप्रकरणी भाजपच्या (BJP) एका शिष्टमंडळाने सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात केली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेताना आंतरधर्मीय तरुण- तरुणींची ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यातून तरुणावर धर्मांतरासाठी दबाव वाढला आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या टीमकडून तरुणाला मारहाण करण्यात आली, असा आरोप सहकारमंत्री अतुल सावे यांनी केला आहे. दीपक सोनवणे असे मारहाण केलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या तरुणाने पत्रकार परिषद घेऊन तरुणीसह तिच्या नातेवाइकांनी अमानुष छळ करीत 11 लाख रुपये उकळल्याचा आरोप केला होता.
काय आहे प्रकरण!
दीपक सोनवणे 2018 पासून शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. यादरम्यान त्याची अन्य धर्मीय विद्यार्थिनीसोबत ओळख झाली. पुढे दोघांमध्ये प्रेम झाले. त्या मुलीने लग्नाचे आमिष दाखवून दीपककडून वारंवार रोख व ऑनलाइन स्वरूपात 11 लाख रुपये उकळले. तसेच, लग्नासाठी धर्मांतराची अट घातली. मार्च 2021 मध्ये तरुणी व तिच्या नातेवाइकांनी नारेगाव येथील घरी नेऊन दीपकला निर्वस्त्र करीत बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ तयार केला. तसेच, बळजबरी एका रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रियाही केल्याचे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये तरुणावर एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिकलठाणा ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. त्यात त्याचे वडील व बहिणींनाही आरोपी केले होते, असा आरोप तरुणाने केला आहे.
भाजपची उडी...
आता या प्रकरणात भाजपने उडी घेतली असून, मंत्री सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात तरुणीकडून सुरुवातीला विनयभंग, नंतर बलात्कार असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले, हेच शंकास्पद आहे असे सावे म्हणाले. त्यामुळे मुलाला न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आली आहे.
भाजपची पोलिसांकडे मागणी...
- जिल्ह्याचा खासदार हा सर्व जनतेचा खासदार असतो, पण या प्रकरणात खासदार जलील यांनी जातीयवादी भूमिका घेतली आहे.
- खासदाराच्या उपस्थितीत व सांगण्यावरून दलित तरुणाला मारहाण केली हे अत्यंत घृणास्पद आहे. त्यामुळे खासदार जलील यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे.
- संबधित मुलीवर आणि तिच्या आई वडिलांवर मारहाण, दरोडा, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अट्रॉसिटी अंतरंग गुन्हा दाखल झाला पाहिजे.
- इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यासाठी दीपक सोनवणेची शस्त्रक्रिया केली गेली. हे अतिशय गंभीर असून हा 'लव्ह जिहाद'चा उलट प्रकार आहे. लव्ह जिहादमध्ये हिंदू मुलींना फसवून मुस्लिम केले जाते. पण या घटनेत बौद्ध मुलाला मुस्लिम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गंभीर प्रकारची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई.
राज्यातील अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता: मंगल प्रभात लोढा